सहकार क्षेत्राने संवेदनशीलता जपून सौजन्यपूर्ण सेवा देण्याची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी, परदेशी आणि सहकारी बँकांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत मॅको बँकेनेही टिकून राहिले पाहिजे. नागरिकांना आधुनिक सेवासुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. सर्व बँकांच्या पदाधिकारी आणि सभासदांनी काम करीत असतांना जागरुक राहणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्राने संवेदनशीलता जपून सौजन्यपूर्ण सेवा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड अलाईड ऑफिसेस को-ऑप (मॅको) बँक लि. मुंबई मंत्रालय शाखेचे नूतनीकरण तसेच बँकेचे अद्ययावत मोबाईल ॲप व यूपीआयचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.मंत्रालयात आयोजित या उद्घाटन कार्यक्रमाला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, मॅको बॅंकेचे अध्यक्ष प्रमोद पंडीत, उपाध्यक्ष भारत वानखेडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक, पदाधिकारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मॅको बँकेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी राज्य शासन सहकार्य करेल. अलिकडे बँकामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढली आहे. काही बँका उत्कृष्टपणे काम करीत असून त्याचे समाधान आहे. मँको बँकेमार्फत गरजूंना तत्काळ कर्ज उपलब्ध करु दिले जाते याचा आनंद आहे. अशा चांगल्या सुविधा सभासदांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न मॅको बँकेमार्फत होत आहे. या बॅकेच्या विस्ताराबाबत आवश्यक नियम व सूचनांचे  पालन करावे. यासाठी राज्य शासनाचा पाठिंबा राहील. बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम असून कोणत्याही अडचणी येऊ देऊ नका. बँकेच्या पदाधिकारी आणि सभासदांनी काम करीत असतांना जागरुक राहणे गरजेचे आहे. भू-विकास बॅकांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!