दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । सातारा । राज्यातील सहकारी बँका, सहकारी पतसंस्था यांच्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आर्थिक परिवर्तनाचे काम केले आहे. सहकार क्षेत्र आणखी समृद्ध करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
सातारा येथील पुणे विभागीय माध्यमिक शिक्षण-शिक्षकेतर सह. पतसंस्थेच्या 45 व्या वर्धापन दिनानमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अर्चना देशमुख, संस्थेचे संस्थापक ता.का. सूर्यवंशी, संस्थेचे चेअरमन अनिल गोडसे, गजानन पाडळे, बाबुराव निंबाळकर, गुलाबसिंग कदम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
गुणवतं विद्यार्थ्यांचे कौतुक करुन श्री. पाटील म्हणाले, सहकारी बँका व पतसंस्थांकडे ठेवी वाढत आहेत. बँकेची व पतसंस्थेची आर्थिक परिस्थिती पाहुनच ठेवीवर व्याजदर द्यावा. शासनाला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. या दोन वर्षाच्या कालावधीत सहकार क्षेत्राच्या समृद्धीसाठी अनेक हिताचे निर्णय घेतले आहेत. सहकार क्षेत्राशी प्राधान्याने शेतकरी जोडलेला आहे. सहकारी बँकांनी व पतसंस्थांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सातारा जिल्हा सहकारी बँक ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करीत असून पुणे विभागीय माध्यमिक शिक्षण-शिक्षकेत्तर सह. पतसंस्थेच्या प्रगतीसाठी नेहमीच सकारात्मक भूमिका राहिल, असे सातारा जिल्हा सहकारी बँके अध्यक्ष नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल गोडसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.