सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली – आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 18 : सातारा जिल्हयाचे राजकीय आणि सामाजिक परंपरेत स्वकर्तृत्वाची मुद्रा उमटविणारे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारी मंत्री व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी जेष्ठ संचालक, विकासरत्न स्व. आ. अभयसिंहराजे भोसले यांची जयंती शनिवार दिनांक १६ मे २०२० रोजी सकाळी ११.००  वाजतां बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, सातारा येथे संपन्न झाली.

महाराष्ट्राच्या  ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचे मोठे योगदान असून सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष आ..शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या उक्तीप्रमाणे जीवन जगत भाऊसाहेब महाराजांनी समाजातील तळागाळातील लोकांसाठी आपले जीवन समर्पित केले. विकास सेवा सोसायट्यांचे जाळे विणत बळीराजाला सक्षम करण्याचे महत्वपूर्ण काम केले. महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्राला चांगली दिशा देण्याचे काम भाऊसाहेब महाराजांनी राज्याचे सहकार मंत्री असताना केले. अजिंक्य उदयोग समूहाची उभारणी करण्याबरोबरच, जिल्हयातील कृषी क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करुन ग्रीन हाऊस उभारणीस चालना दिली. ग्रीन हाऊस उभारणी पासून उत्पादीत फुले व भाजीपाल्यास देशांतर्गत व परदेशी बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. उच्च तांत्रिक शेतीसाठी कर्ज पुरवठा करण्यासाठी जिल्हा बँकेत हायटेक कृषी विभागाची स्थापना केली. स्व. भाऊसाहेब महाराजांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे कामकाज यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, आर .डी .पाटील, आबासाहेब वीर आणि भाऊसाहेब महाराजाच्या विचार धारेवर,  ना. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. महाराष्ट्रात मोठया प्रमाणात सहकाराचा विस्तार  झालेला आहे.

यावेळी उपाध्यक्ष सुनील माने म्हणाले, विना सहकार नाही उद्धार हे ओळखून भाऊसाहेब महाराजांनी सहकारात क्रांती घडवली. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व सुत गिरणीच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी, सातारा जिल्हा बँक सहकारातील दीपस्तंभ असून सद्या सहकारापुढे अनेक अडी-अडचणी, तीव्र स्पर्धेला सामोरे जावून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असलेची सांगितले. भाऊसाहेब महाराजांनी राजकारणात सक्रीय राहून राजकारणाला कमी महत्व देत समाजकारणाला अधिक महत्व दिले. तालुक्यात ठीक-ठिकाणी बंधारे बांधून डांबरी रत्याने गावे जोडून प्रत्येक गावाला विकास प्रवाहात आणले.

यावेळी बँकेचे अध्यक्ष आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष  सुनील माने यांनी भाऊसाहेब महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र आदरांजली वाहिली तसेच बॅंकेचे संचालक  प्रकाश बडेकर, संचालिका सौ. कांचनताई साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक  राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे, विविध विभागाचे व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, विभागप्रमुख, अधिकारी व सेवक यांनी स्व. भाऊसाहेब महाराज यांचे प्रतिमेस फुले वाहून विनम्र अभिवादन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!