बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सिंधुदुर्ग, दि.१७ : पर्यटन जिल्हा म्हणून स्थान मिळवणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विमानतळाचे स्वप्न अखेर पूर्णत्वास येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काही ना काही कारणाने रखडलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा येत्या २३ जानेवारी रोजी समारंभपूर्वक होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबतच भाजप नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून हा सोहळा लक्षवेधी ठरणार आहे.

चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा २६ जानेवारी रोजी होईल, असे आधी सांगण्यात आले होते. मात्र, त्यात बदल करून हा सोहळा शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी २३ जानेवारी रोजी ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि नारायण राणे अनेक वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांवर कोणते वाक्बाण सोडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानंतर राणे आणि शिवसेना यांच्यात विस्तवही जात नाही. त्यात राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र सातत्याने ठाकरे कुटुंबाला लक्ष्य करत आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे यांचा अनेकदा तोलही गेला आहे. उद्धव यांच्याकडूनही या टीकेला वेळोवेळी जशास तसे प्रत्युत्तर मिळालेले आहे. विशेष म्हणजे ज्या चिपी विमानतळाच्या कार्यक्रमाला ठाकरे-राणे एका व्यासपीठावर येत आहेत त्यावरूनही बरंच वादंग उठलेलं आहे.

नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी काही दिवसांपूर्वीच केली होती. नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हा खासदार राणे यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून या विमानतळाला “स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ” असे नाव दिले पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे ट्वीट नितेश यांनी केले होते. तर शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी त्यावर जोरदार शब्दांत तोफ डागली होती. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले त्याचवेळी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केलेली आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही’, असे वैभव नाईक म्हणाले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे.


Back to top button
Don`t copy text!