स्थैर्य, मुंबई, दि.२५: मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. अशाातच मुख्यमंत्र्यांनीच उद्घाटन केलेल्या मुलुंडच्या कोव्हिड सेंटरमध्ये आयसीयू बेड्स, डायलॅसीस बेड्स उपलब्ध नसल्याची गंभीर बाब सामोर आली आहे. उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्सही धूळखात पडून आहेत. त्यामुळे नावाला जरी ‘जम्बो’ असली, तरी सोयी-सुविधांच्या बाबतीत ही कोव्हिड सेंटर्स ‘कुपोषित’ असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने मुंबईत जम्बो कोव्हिड सेंटर्स उभारण्याचा निर्णय घेतला. त्या अंतर्गत ठिकठिकाणी जम्बो कोव्हिड सेंटर्स उभारण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ७ जुलैला मुलुंडच्या एलबीएस मार्गावरही अशाच कोव्हिड सेंटरची उभारणा करण्यात आली. मुलुंड परिसरातील कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार व्हावा, त्यांना लवकर उपचार मिळावेत हा त्यामागचा उद्देश होता. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे.
या कोव्हिड सेंटरचे उद्घाटन होऊन तीन महिने उलटले तरी आयसोलेशन बेड वगळता २१५ आयसीयू बेड्स, ७५ डायलॅसिस बेड्स अजूनही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. आयसीयू बेड्स ८ जूनपर्यंत उपलब्ध करुन देण्याचे आदेश होते. ते नसल्याने ७४ व्हेंटिलेटर्सही धूळखात पडून आहेत. मुलुंड कोव्हिड सेंटरमधील हा भोंगळ कारभार समोर आल्याने मुंबईतील कोरोनाची भीषण परिस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे.