
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह माढा तालुक्यातील नुकसानीचा घेतला आढावा
स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : राज्यात परतीच्या पावसाने घातलेल्या थैमानामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढा तालुक्याचा दौरा केला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत विविध भागांतील परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिली.
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. आरोग्य तसेच इतर शासकीय विभागांनी नागरिकांना तातडीने मदत पोहोचवावी, असे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
या पाहणी दौऱ्यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते, सोलापूर ग्रामीण पश्चिमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.