
स्थैर्य, फलटण, दि. 25 ऑक्टोबर : फलटण तालुक्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या विविध प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि निरा देवघर पाणी योजनेच्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी उद्या, रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता फलटण येथे भव्य ‘कृतज्ञता मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते या कामांचा शुभारंभ होणार आहे, अशी माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने आयोजित हा मेळावा येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी १० वाजता सुरू होईल. महायुती सरकारच्या माध्यमातून फलटण तालुक्यासाठी मंजूर झालेल्या, विशेषतः अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निरा देवघर पाणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कालव्याच्या कामाला गती मिळाल्याबद्दल सरकारचे आभार मानणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील असणार आहेत. तर, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या महत्त्वपूर्ण सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय, सातारा जिल्हा व माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे आजी-माजी आमदार, खासदार आणि सर्व प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

आयोजक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ‘चलो फलटण’ अशी हाक देत, तालुक्यातील तमाम नागरिकांना या कृतज्ञता मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाच्या या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या भूमिपूजन सोहळ्यामुळे फलटणच्या विकासातील एक नवा अध्याय सुरू होणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.


