फलटण तालुक्याच्या विकासाला नवी दिशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विकासकामांचे भूमिपूजन ‘कृतज्ञता मेळाव्या’चे आयोजन; निरा देवघर पाणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ


स्थैर्य, फलटण, दि. 26 ऑक्टोबर : फलटण तालुक्याच्या विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि निरा देवघर पाणी योजनेच्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचा शुभारंभ आज, रविवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भव्य ‘कृतज्ञता मेळाव्या’चे आयोजन केले आहे.

हा कृतज्ञता सोहळा येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात सकाळी १० वाजता सुरू होईल. महायुती सरकारच्या माध्यमातून, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने फलटण तालुक्यासाठी अनेक विकासकामे मंजूर झाली आहेत. यामध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या निरा देवघर पाणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कालव्याच्या कामाचा समावेश आहे. या कामांना गती मिळाल्याबद्दल सरकारचे आभार मानणे, हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील असणार आहेत. तर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या सर्व विकासकामांचे भूमिपूजन संपन्न होईल.

या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या मान्यवरांसह सातारा जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे सर्व आजी-माजी आमदार, खासदार, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

फलटण तालुक्याच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे मानले जात आहे. निरा देवघर योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामामुळे तालुक्यातील मोठ्या क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार असून, इतर विकासकामांमुळेही तालुक्याच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या भूमिपूजन सोहळ्यामुळे फलटणच्या विकासाचा एक नवा अध्याय सुरू होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.

कार्यक्रमाचे निमंत्रक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ‘चलो फलटण’ अशी हाक दिली आहे. तालुक्यातील तमाम नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या कृतज्ञता मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून विकासाच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!