
डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा कोणताही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण येथील सभेत स्पष्ट केले. तपास पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली.
स्थैर्य, फलटण, दि. १९ डिसेंबर : डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दुरान्वयेही संबंध नाही. या प्रकरणाचा तपास १०० टक्के पूर्ण झाला असून तांत्रिक पुरावेही हाती आले आहेत. यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, असे स्पष्ट प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फलटण येथे महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचारसभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. डॉ. संपदा मुंडे यांच्या मृत्यूचे भांडवल करून विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले,
“डॉ. संपदा मुंडे या माऊलीने एका विशिष्ट परिस्थितीमध्ये जीवन संपवले. त्या कोणाकडून प्रताडित होत्या, हे तपासात समोर आले आहे. दुर्दैवाने या घटनेचे भांडवल आणि राजनीतीकरण करून कोणाला तरी टार्गेट केले जात आहे. मी विधानसभेतही तपासाची माहिती दिली होती. आज पुन्हा सांगतो, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नाही. तपास पूर्ण झाला असून सर्व पुरावे मिळाले आहेत. दोषींना शिक्षा होईलच, शिवाय त्या माऊलीच्या कुटुंबीयांनाही आम्ही मदत करू.”
विकासकामांचा धडाका आणि विरोधकांवर टीका
फलटण शहराच्या विकासासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हजारो कोटींचा निधी आणल्याचे फडणवीस यांनी सांगितले. फलटण-पंढरपूर पालखी मार्ग, बारामती रस्ता, एमआयडीसी आणि प्रशासकीय भवनासारख्या कामांचा उल्लेख त्यांनी केला. “विरोधकांकडे सांगण्यासारखे काही नाही, त्यामुळे ते केवळ टीका करत आहेत. मात्र, मी केलेल्या कामांवर मते मागायला आलो आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षपदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकरांना पसंती
शहराचा विकास वेगाने करण्यासाठी नगरपालिकेत महायुतीची सत्ता येणे गरजेचे असल्याचे सांगत, त्यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन केले. “केंद्राचा आणि राज्याचा पैसा थेट शहराच्या विकासाला लावण्यासाठी आपल्या विचाराचा नगराध्यक्ष हवा,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या सभेला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, राम सातपुते, धैर्यशील कदम यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फलटण नगरपरिषदेसाठी २० डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे.

