इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयातील आग रोखण्याच्या प्रसंगावधानाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक


स्थैर्य, मुंबई, दि. ११: इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये लागलेली आग प्रसंगावधान राखून वेळीच आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या परिस्थितीबाबत माहिती घेत, त्यांची काळजी घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

या घटनेची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी रुग्णालय प्रशासन तसेच विविध यंत्रणांकडून माहिती घेतली व याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत केले.

आयजीएम रुग्णालयातील आयसीयू मधील यंत्रात आग लागल्याचे लक्षात येताच, या ठिकाणच्या वार्ड बॉय, सुरक्षा रक्षक, तसेच डॉक्टर्स या सर्वांनी तत्काळ हालचाली केल्या. प्रसंगावधान राखून अग्निशमन उपकरणाचा वापर करून आग रोखण्यात आली. वीज पुरवठा बंद करून, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यात रुग्णांचीही पुरेपूर काळजी घेण्यात आल्याने पुढील अप्रिय घटना टाळण्यात यश आले.

घटनाक्रमाची माहिती घेतल्यानंतर मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी घटनास्थळावर धाडसाने, प्रसंगावधान राखून आग रोखण्यासाठी तत्काळ धावपळ करणाऱ्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र शेटे तसेच वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक, डॉक्टर्स अशा सर्वांचे आणि त्यांच्या समन्वयाचे कौतुक केले. यांनी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सुखरूप राहावेत यासाठी केलेल्या प्रयत्नांचीही प्रशंसा करून त्यांची काळजी घेण्याचे निर्देशही दिले.


Back to top button
Don`t copy text!