
दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । सातारा । साताऱ्यातील पाचगणी मेढा, वाई कवठे बोपेगाव भागात गुरुवारी सायंकाळी ढगफुटी सदृश पाऊस झाला. या पावसाने पाचगणी बाजार पेठेतील रस्त्यावरून पाणी वाहीलं. त्यामुळे बाजारपेठेला नदीचे स्वरूप आले. तर वाई तालुक्यातील कवठे, बोपेगाव, शिरगाव येथेही मुसळधार पावसामुळे शेतजमिनी पिकांसह वाहून गेल्या. या पावसाने शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले.
साताऱ्यातील पाचगणी मेढा (ता जावळी) व वाई तालुक्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसाने सगळीकडे पाणी पाणी केले. पाचगणी, मेढा, बाजारपेठेत पावसाचे पाणी घुसले. त्यामुळे रस्त्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता. रस्त्यावरून वाहनांना मार्ग काढताना शिकस्त करावी लागत होती. तुफान पावसामुळे मेढ्यातील वेण्णा चौकाला तलावाचे स्वरूप आले होते.
जावली तालुक्यातील करंदोशी, कुडाळ, करहर, वाईतील कवठे, व
वहागाव, बोपेगाव, शिरगाव, भुईंज, पाचवड आदी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. ओढ्याचे पाणी गावात घुसले. शेतजमीन पिकांसह वाहून गेली. ओढेनाले भरून वाहिले. मागील अनेक वर्षात असा पाऊस झाला नसल्याचे वयोवृद्ध लोकांनी सांगितले. साताऱ्यातील पंचवीस किलोमीटर परिसरात ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस झाला. रस्त्यावर पाण्याचे लोट, ग्रामीण भागात चिखल आणि पाणी दुकानांमध्ये शिरले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दि २७ व २८ जुलै रोजी कवठे, बोपेगांव व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची वाईचे तहसीलदार रणजित भोसले तसेच गट विकास अधिकारी नारायण घोलप आणि तालुका कृषी अधिकारी, प्रशांत शेंडे यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी त्यांनी पाऊस झालेल्या गावात प्रत्यक्ष नुकसान स्थळी भेट दिली आणि तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक यांना झालेल्या सर्वप्रकारच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी तिन्ही विभागाचे गाव पातळीवरील अधिकारी आणि कर्मचारी तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य व अन्य नागरिक उपस्थित होते.