
स्थैर्य, म्हसवड, दि. २८ सप्टेंबर : म्हसवड आणि परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने प्रचंड हाहाकार माजवला आहे. या पावसामुळे गोरगरीब, दलित व मागासवर्गीय कुटुंबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून, काही घरे पूर्णतः जमीनदोस्त झाल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. या पार्श्वभूमीवर, शासनाने बाधित कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत, धान्यपुरवठा आणि घरे बांधून द्यावीत, अशी मागणी ॲड. राजू भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या ढगफुटीमुळे ओढे, नदी आणि नाले तुडुंब भरून वाहिले, वस्तीत पाणी शिरल्याने अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. रस्ते आणि गल्ली-बोळ चिखल व पाण्याखाली गेले आहेत. ॲड. भोसले यांनी म्हटले आहे की, बाधित कुटुंबातील बहुतांश लोक शेतमजूर, विटभट्टी कामगार व हमाल असून, त्यांच्याकडे पुन्हा संसार उभा करण्याची ताकद नाही. लहान मुलांसह ही कुटुंबे उघड्यावर रात्र काढत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाने या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत करावी, तसेच तहसील कार्यालय व नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना घरे बांधून देण्याची सोय करावी. पावसामुळे रस्ते व गटारे कोसळल्याने संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने यावरही तातडीने लक्ष द्यावे, असे आवाहन ॲड. राजू भोसले यांनी केले आहे.