स्थैर्य, सातारा : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची वर्णी लागावी, यासाठी मागणी फलटण तालुक्यासह जिल्ह्यातून जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज साताऱ्यातील विश्रामगृहात खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी श्रीमंत रामराजे यांच्यासमवेत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे ही उपस्थित होते. प्रथमच या तिघा बंधूंनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादीतील काहींच्या भुवया उंचावल्या होत्या. खासदार शरद पवार व श्रीमंत रामराजे, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत रघुनाथराजे यांच्यात सातारा सर्किट हाऊस येथे सुमारे एक तास कमरा बंद चर्चा झाली असल्याचे समजत आहे.
विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 जागा रिक्त आहेत. या जागांवर आपल्याच पक्षातील कोणाची तरी वर्णी लागावी, यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता प्रयत्न करत आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नेत्याची वर्णी लावण्यासाठी धडपडत आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत त्यांच्या कोट्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर साताऱ्यातून फलटणचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
आजपर्यंत श्रीमंत रामराजेंसोबत त्यांचे तीनही चुलत बंधू एकाचवेळी कधीही खासदार शरद पवार यांना भेटले नव्हते. आज प्रथमच ते तिघेही शरद पवार यांना भेटले. त्यामुळे राष्ट्रवादीतील काहींच्या भुवया उंचावल्या गेल्या. दरम्यान, खासदार शरद पवार यांच्यासमवेत या तिघांची कमराबंद चर्चा झाली. यामध्ये श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. आता राजू शेट्टीनंतर श्रीमंत संजीवराजेंना विधान परिषदेवर घेऊन सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार वाढविला जाणार का, असा प्रश्न आहे.