मंदिर बंद, उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार! भाजपचे राज्यभर आंदोलन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.११: राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि मंदिरे उघडण्यास परवानगी न देण्याच्या मुद्यावरून भाजप आक्रमक झाला आहे. राज्य सरकारविरोधात भारतीय जनता पक्षातर्फे सोमवारी आणि मंगळवारी (१२ आणि १३ ऑक्टोबर) राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी ही माहिती दिली.

महिलांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात १२ आॅक्टोबर रोजी भाजप महिला आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे, तर १३ आॅक्टोबर रोजी मंदिरे उघडण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती उपाध्ये यांनी दिली.

मदिरालये उघडण्यास परवानगी देणाºया महाआघाडी सरकारने मंदिरे उघडण्यास मात्र अजून परवानगी दिलेली नाही. या विरोधात १३ आॅक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाईल. ‘मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार’, अशी टीका यावेळी उपाध्ये यांनी करत हीच भाजपच्या आंदोलनाची टॅगलाईन असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे मंदिर पुन्हा उघडली जावीत, या मागणीसाठी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात संत, महाराजांच्या बरोबर मंदिरांवर उपजीविका अवलंबून असणारी छोटी व्यावसायिक मंडळीही सहभागी होणार आहेत, असे उपाध्ये यांनी सांगितले.

महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला, तरुणी, बालिकांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र मुख्यमंत्री, गृहमंत्री या अत्याचारांची गंभीरपणे दखल घेत नाहीत. म्हणूनच या असंवेदनशील सरकारच्या विरोधात १२ आॅक्टोबर रोजी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे, असे चित्रा वाघ यांनी सांगितले.

कृषी कायद्यासाठी आनंदोत्सव

याच बरोबर मोदी सरकारने केलेल्या ३ कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी राज्यभर आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ १२ आॅक्टोबर रोजी पुणे जिल्ह्यातील वरवंड ते चौफुला अशी ट्रॅक्टर यात्रा काढून होणार आहे. या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी होणार आहेत, अशी माहितीही केशव उपाध्ये यांनी दिली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!