फलटण मध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ!

शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये काही दिवसांपूर्वी आमदार दीपक चव्हाण यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे शिलेदार सचिन सुधाकर पाटील यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे; यामुळे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ अर्थातच शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच सामना रंगणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

गतकाही दिवसांपासून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्की निवडणूक कशी होईल किंवा महाविकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तिकिटावर माजी खासदार रणजितसिंह यांचे शिलेदार असलेले सचिन पाटील निवडणूक लढवणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागून राहिले होते. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवारी ही सचिन सुधाकर पाटील यांना जाहीर केल्याने सर्व प्रश्न मार्गी लागले आहेत.

श्रीमंत रामराजे काय भूमिका घेणार?

विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आत्ता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की कोणती भूमिका घेणार याकडे सुद्धा आता जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. याचे कारण सुद्धा तसेच आहे; गतवर्षात राज्यामध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींमध्ये शरद पवारांची साथ सोडून अजितदादा पवारांच्या सोबत जाण्याचा निर्णय त्यावेळी श्रीमंत रामराजे यांनी घेतलेला होता. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत रामराजे यांनी माजी खासदार रणजितसिंह यांना विरोध करत महायुतीच्या विरोधात रान पेटवलेले होते.

त्यानंतर श्रीमंत रामराजे यांचे कार्यकर्ते असलेले आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत रामराजे यांचे बंधू तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे. व दीपक चव्हाण यांनी सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला आहे.

या सर्व बाबींचा विचार करता विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आत्ता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा उघड उघड प्रचार करणार की पडद्याआड राहून सुत्रे हलवणार ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Back to top button
Don`t copy text!