
दैनिक स्थैर्य । 14 जुलै 2025 । फलटण । लोणंद येथील श्रीभैरवनाथ डोंगर ग्रुपचे क्रियाशील सदस्य संतोष कोकरे व राजेंद्र शेळके यांनी भैरवनाथ डोंगर सलग 27 वेळा चढ- उतार करून सुमारे 54 किलोमीटर अंतर पावणेअकरा तासांमध्ये पूर्ण करून पर्यावरण व निरोगी आरोग्याचा संदेश दिला. राजेंद्र शेळके व संतोष कोकरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
राजेंद्र शेळके व आयर्नमॅन संतोष कोकरे यांनी सोमवारी रात्री दहा वाजता भैरवनाथ डोंगर चढण्यास व उतरण्याससुरुवात केली. सुमारे एक किलोमीटर अंतर लांबीचा डोंगर एकदा चढून व उतरून दोन किलोमीटर अंतर होत आहे. असे सुमारे 27 वेळा डोंगर चढ-उतार करून सुमारे 54 किलोमीटरचे अंतर पावणेअकरा तासांत पूर्ण करण्याचा विक्रम केला. सोमवारी रात्री दहा वाजता सुरू केलेला उपक्रम मंगळवारी दुपारी सुमारास पूर्ण झाला. श्री भैरवनाथ डोंगर ग्रुप गेल्या आठ वर्षांपासूनया डोंगरावर वृक्ष लागवड करून त्याचे यशस्वी संगोपन करीत आहे. आतापर्यंत 200 झाडांचे यशस्वी संगोपन कोणतीही पाण्याची सोय नसताना केली आहे. झाडे
लावा झाडे जगवा हा पर्यावरणाचा संदेश देण्याबरोबरच प्रत्येकाने आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज चालावे व पळावे, यासाठी हा उपक्रम केल्याचे श्री. शेळके व श्री. कोकरे यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी रात्रभर त्यांच्यासोबत वरुण क्षीरसागर, इरफान मोकाशी, शुभम क्षीरसागर यांनी सहकार्य केले. त्याचबरोबर श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या सदस्यांनी त्यांना सहकार्य केले. श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या वतीने शेळके व कोकरे यांचा रानफुलांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला.