स्थैर्य , भंडारा , दि .२५: जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवावेळी रात्री एक कर्मचारी ड्यूटीच्या वेळेत दोन तास बाहेर गेल्याचे तसेच शिशु केअर युनिटमध्ये कुणीही नसल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले आहे. हे फुटेज चौकशीदरम्यान महत्त्वाचा पुरावा ठरल्याचे समोर आले आहे.
शिशू केअर युनिटमध्ये ८ जानेवारी रोजी मध्यरात्री लागलेल्या आगीमध्ये १० तान्हुल्यांचा बळी गेला होता. याप्रकरणी नागपूर विभागीय आयुक्त संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने चौकशी केली. त्याचा अहवाल नुकताच राज्य सरकारला सादर करण्यात आला. या समितीने चौकशीदरम्यान रुग्णालयाची पाहणी करून जबाब नोंदवले तसेच रुग्णालय बाहेरील व आतील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. घटना घडली त्या वेळी रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर असलेल्या शिशू केअर युनिटमध्ये कोणीही कर्तव्यावर नसल्याचे दिसून आले. घटना घडल्यानंतर तिथे मदतीसाठी धावून आले ते सर्व त्या फुटेजमध्ये दिसताहेत. त्यामुळे घटनास्थळावर पोहोचलेले सर्व इतर ठिकाणांवरून आल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट होते. तसेच दुर्घटनेवेळी ड्यूटीवरील कोणताही कर्मचारी युनिटमध्ये नसल्याचे स्पष्ट होते.
ड्यूटीच्या वेळेस बाहेर
घटनेच्या वेळेस आपण दुसऱ्या वॉर्डात असल्याचे एका कर्मचाऱ्याने चौकशी समितीला सांगितले. मात्र तो कर्मचारी रात्री १० वाजता ड्यूटीवर येताना सीसीटीव्हीत दिसून येत आहे. त्यानंतर रात्री ११.३० च्या सुमारास दुचाकीवर बसून बाहेर गेला. त्यानंतर मध्यरात्री १.३० वाजता दुचाकीने रुग्णालयात दाखल झाल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.