कास धरणाचे रखडलेले काम पुर्ण होण्याचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा पुन्हा यशस्वी; वाढीव ५७ कोटींसाठी ना. अजितदादांची मान्यता

स्थैर्य, सातारा, दि. १९ : वाढीव निधी मिळत नसल्याने सातारकरांचा जीवनदाता असलेल्या कास धरणाच्या उंची वाढवण्याच्या कामाला ब्रेक लागला होता. ज्या ना. अजित पवारांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरुन या प्रकल्पाला मंजूरी दिली होती त्याच ना. पवारांनी आज पुन्हा आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याच मागणीवरुन कास धरण प्रकल्पासाठी वाढीव ५७ कोटी निधी देण्यासाठी मान्यता दिली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कास धरणाचे काम पुर्णत्वास नेण्यासाठी सुधारीत प्रस्तावास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा कास धरणासाठी निधी मंजूर होणार असून बहुचर्चीत आणि महत्वकांक्षी कास धरण प्रकल्पाचे काम पुर्ण होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

सातारा शहरासह आसपासच्या १५ गावांचा पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी मिटण्यासाठी कास धरणाची उंची वाढवणे आवश्यक होते. हे ओळखून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे सरकार असताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करुन कास धरणाची उंची वाढवण्याचे काम मंजूर करुन घेतले होते. त्याचवेळी राज्याच्या पाणीपुरवठा विभागाकडून निधीही उपलब्ध करुन घेण्यात आला होता. तसेच वन विभाग, हरित लवाद यासह अनेक विभागाच्या परवानग्याही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अथक पाठपुराव्यातून मिळवण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. सद्य परिस्थितीत कास धरण प्रकल्पाचे काम ७५ ते ८० टक्के पुर्ण झाले आहे. मात्र वाढीव निधीची तरतूद न झाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील काम रखडले आणि कास धरण प्रकल्प पुर्णत्वास जाणार का? सातारकरांचा पाणीप्रश्‍न सुटणार का, असे प्रश्‍न निर्माण झाले होते. मात्र पुन्हा एकदा ना. अजित पवार आणि आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळे सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

काहीही करुन कास धरणाची उंची वाढवण्याचे काम पुर्ण झाले पाहिजे आणि सातारकरांचा पाणीप्रश्‍न कायस्वरुपी सुटला पाहिजे यासाठी सातात्याने अभ्यासपुर्ण पाठपुरावा करणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी रखडेलेल्या या प्रकल्पासाठी पुन्हा एकदा पाठपुरावा सुरु केला. महाआघाडी मंत्रीमंडळाच्या स्थापनेनंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सातारकरांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी, कास धरण प्रकल्पासाठी वाढीव निधी देण्याची मागणी केली. तसेच यासंदर्भात तातडीने निर्णय व्हावा, यासाठी संबंधीत सर्व विभागांची बैठक घ्यावी, अशा मागणीचे पत्रही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांना दिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याच दालनात आज बैठक झाली. या बैठकीला ना. पवार यांच्यासह आ. शिवेंद्रसिंहराजे, राज्याच्या पाणीपुरवठा विभागाचे सचिव चहांदे, नगर विकास विभागाचे सचिव महेश पाठक, वित्त व नियोजन विभागाचे सचिव दहीङ्गळे, जलसंपदा विभागाचे सचिव मोहिते, संबंधीत सर्व विभागांचे अधिकारी, परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले उपस्थित होते. तसेच या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, सातारा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता प्रकाश मिसाळ, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट हेही व्हिडीओ कॉन्ङ्गरन्सिंगद्वारे जोडले गेले होते.

बैठकीत झालेल्या सवीस्तर चर्चेनंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार ना. अजित पवार यांनी कास धरण प्रकल्पाच्या उर्वरीत कामासाठी सुधारीत प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी वाढीव ५७ कोटी निधी नगरविकास विभागामार्फत नगरोत्थानमधून उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही घेण्यात आला. सदर कामाचा सुधारीत वाढीव निधी मागणी प्रस्ताव येत्या सात दिवसांत देण्याच्या सुचना ना. पवार यांनी सातारा पाटबंधारे विभागाला केल्या. दरम्यान, या निधीसह सातारा कास ते बामणोली या बाधीत रस्त्याच्या कामासाठीही ६ कोटी निधीची वेगळी तरतूद करुन हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्याचा निर्णय ना. पवार यांनी बैठकीत घेतला. या ऐतिसाहिक आणि निर्णायक बैठकीमुळे कास धरण प्रकल्पातील रखडलेली घळ भरणी, सांडवा बांधकाम व उर्वरीत सर्व प्रकारची कामे मार्गी लागण्यासाठी निधी उपलब्ध होणार असून प्रकल्पाचे काम जून २०२१ पर्यंत पुर्ण केले जाणार आहे. तशा सुचनाही ना. पवार यांनी संबंधीत विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या आहेत.

दरम्यान, ना. अजित पवार यांचे सातारा शहराच्या विकासावर नेहमीच लक्ष राहिले आहे. त्यांच्यामुळेच कास धरण उंची वाढवण्याच्या कामला मंजूरी आणि निधीही मिळाला होता. हा प्रकल्प रखडेलेला असताना आज त्यांच्याच माध्यमातून वाढीव निधीही मिळाला आहे. ना. अजितदादा यांच्या माध्यमातून सातारा शहरातील अनेक प्रश्‍न सोडवण्यासाठी मदत झाली आहे. आजही त्यांनी सातारकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक बोलावून मोठा निर्णय घेतला. यावरुन ना. अजितदादांचे सातारकरांवर किती प्रेम आहे हे दिसून येते. सातारकरांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी नेहमीच सकारात्मक सहकार्य करणार्‍या ना. अजितदादा यांच्यामुळे सातारकरांचा पाणीप्रश्‍न कायमस्वरुपी सुटणार आहे. याबद्दल मी ना. अजितदादांचे विशेष आभार मानतो, अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांचे घेतलेल्या निर्णयाबद्दल आभार मानले.

सातारकरांसाठी पुन्हा धावले दादा- बाबा

कास धरण उंची वाढवण्याच्या कामाला आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीमुळेच तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या ना. अजित पवार यांनी मंजूरी दिली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे आणि अजितदादा यांचे मैत्रीपुर्ण संबंध सर्वांनाच माहिती आहेत. बाबाराजेंनी नेहमीच विकासात्मक दृष्टकोन ठेवून काम केले आहे. कास धरण प्रकल्पाचे रखडलेले काम पुर्णत्वास जाणार का, असा प्रश्‍न निर्माण झालेला असतानाच सातारकरांचा हा प्रश्‍न सोडवण्यासाठी पुन्हा एकदा दादा- बाबांची जोडीच धावून आले. ज्या दोघांच्या माध्यमातून या प्रकल्पाला मंजूरी मिळाली होती आज त्याच अजितदादा आणि शिवेंद्रसिंहराजे या दोघांच्या माध्यमातून हा रखडलेला प्रकल्प पुर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे सातारकरांच्या मदतीला पुन्हा एकदा दादा आणि बाबा धावून आले, अशी समाधानी प्रतिक्रीया सातारकरांमधून व्यक्त होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!