दैनिक स्थैर्य । दि. १० नोव्हेंबर २०२२ । सातारा । ऐतिहासिक सातारा नगरीत छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाच्या खाणाखुणा जतन व्हाव्यात म्हणून उभारण्यात आलेल्या छ. शिवाजी महाराज संग्राहलयास कचरा आणि घाणीने अवकळा प्राप्त झाल्याने माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. छ. शिवाजी संग्राहलयाची अवकळा पाहून त्यानी तातडीने येसुबाई फौडेशनच्या माध्यमातून स्वच्छताही करून घेतली. यादम्यान वस्तुसंग्राहालयाचे प्रमुख प्रविण शिंदे यांनी सुहास राजेशिर्के यांचे अभिनंदन केले.
सातारा ही मराठ्यांची राजधानी आहे. येथे देशविदेशातून पर्यटक येत असतात. छ. शिवरायाच्या इतिहासाची साक्ष देणारी ही नगरी आहे. या नगरीत छ.शिवाजी महाराज संग्रहालय काही वर्षापूर्वी श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आले. महामारीच्या काळात या नव्याकोऱ्या जम्बो कोविड सेंटर जिल्हा प्रशासनाने चालवले. प्रारंभी हे वस्तुसंग्रहालय जब्मो कोविड सेंटरसाठी देऊ नये असा सूर सातारकरांचा होता. मात्र माणसाचे प्राण वाचविण्याच्यादृष्टीने जिल्हाप्रशासन वापरत असेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही वास्तू असल्यामुळे सर्वांना सोयीचे ठरू शकेल म्हणून पुढे सातारकरांनी हरकत घेतली नाही. वास्तविक या जम्बो कोविड सेंटरमुळे अनेकांचे प्राणही वाचले. मात्र सेंटर बंद झाल्यानंतर ही वास्तू पुन्हा आहे तशी छ. शिवाजी महाराज संग्राहलयाच्या यंत्रणेकडे द्यायला हवी होती. मात्र तसे न होता या वास्तूकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. निष्काळजीपणा दाखवत छ. शिवरायांच्या नावाचे पावित्र्य जपले नाही. गाफील राहून या वास्तूला अवकळा कशी येईल हेच पाहिले. वैद्यकिय कचरा, इतर साहित्य, प्लॕस्टिकच्या पिशव्या, बाटल्या अस्तावस्त्य सोडून जिल्हाप्रशासनाने निष्काळजीपणा दाखवला. खरंतर, ही वास्तू छत्रपती शिवाजी महाराज संग्राहालयाच्या यंत्रणेच्या ताब्यात देताना जिल्हा प्रशासनाने वास्तूची केवळ स्वाच्छताच नव्हेतर रंगरंगोटी करून पुन्हा नव्याकोऱ्या अवस्थेत द्यायला हावी होती. मात्र तसे झाले नाही. प्रशासनाकडून असा गाफीलपणा होणे हे गंभीर गंभीर आहे. यामुळे छत्रपती शिवरायांच्या वास्तुसंग्रहालयाचे पावित्र्य जपले गेले नाही. म्हणून याला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी अशी मागणीही सुहास राजेशिर्के यांनी केली.