
स्थैर्य, 5 जानेवारी, सातारा : चित्रपट गीते येतात अन् निघून जातात; पण अभिजात संगीत हे अजरामर राहते. तेव्हा सर्वांनी संगीत नाट्य परंपरा जोपासण्यासाठी काहीना काही योगदान देत राहावे, असे आवाहन सनदी लेखापाल विजयकांत कुलकर्णी यांनी केले.
येथील स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान, पुणे येथील बालगंधर्व संगीत रसिक मंडळ व महाराष्ट्र साहित्य परिषदेची कोरेगाव शाखेच्या संयुक्त विद्यमाने येथील नागनाथ सौदागर गोरे तथा स्वरराज छोटा गंधर्व यांच्या 28 व्या स्मृतिदिनानिमित्त स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव आणि स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. संत साहित्याचे अभ्यासक राजेंद्र शेलार अध्यक्षस्थानी होते. श्री स्वामी समर्थ रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त बाळासाहेब स्वामी, किन्हईचे राजेंद्र भोसले, दयानंद भोसले, सुरेश साखवळकर उपस्थित होते.
राजेंद्र शेलार म्हणाले, सातार्याची भूमी ही प्रगल्भ, ताकदवान आहे. या भूमीने संगीत नाट्यक्षेत्रात नारायण राजहंस तथा बालगंधर्व, शाहीर पढे बापूराव, साहित्य क्षेत्रात ना. ह. आपटे, संत परंपरेत निगडीचे निजानंद रंगनाथ स्वामी, त्रिपुटीचे गोपानाथ महाराज अशी अनेक रत्ने दिली. या रत्नांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्नकरण्याचा संकल्प करू या.
बाळासाहेब स्वामी यांनी लहानपणी छोटा गंधर्व यांचे गायन ऐकल्याची आठवण सांगितली. श्री. भोसले यांनी छोटा गंधर्व स्मृतिदिन
कार्यक्रम कायम राहावा, यासाठी 51 हजार, तर श्रीपती माने यांनी पाच हजारांची देणगी दिली. राजेंद्र भोसले यांनीही योगदान देण्याची ग्वाही दिली. श्री. साखवळकर यांनी आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नाने छोटा गंधर्व यांच्या नावाने कोरेगावात नाट्यगृह उभे राहात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोसावी यांनी स्वागत केले. सचिव बापूसाहेब भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रसिद्ध तबला वादक पांडुरंग मुखडे, डॉ. प्रकाश भंडारी,डॉ. सच्चिदानंद गोसावी, अॅड. जयवंतराव केंजळे, सी. आर. बगें, माणिकराव भोसले, डॉ. शीतल गोसावी, नारायणराव जगताप, नंदकुमार माळवदे, अशोक साळुंखे, राजेंद्र धर्माधिकारी, प्रदीप लोहार, बापूसाहेब साळुंखे, वैभव साने, बारीकराव जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी निनाद जाधव (पुणे) यांना छोटा गंधर्व गुणगौरव, तर भजन गायक नामदेवराव मोरे (अंबवडे), हार्मोनियम वादक धर्मराज दिवसे (फलटण), क्लॉरिओनेट वादक दाऊदभाई इनामदार (किन्हई), मृदंग वादक सुशांत घोरपडे (खोजेवाडी), तबला वादक सूर्यकांत लावंड (खातगुण) यांना स्मृती पुरस्काराने गौरवले.

