स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 16 : पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच काल रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. यामध्ये दोन भारतीय जवानांसह एक अधिकारी असे तीन जण शहीद झाले. ७० च्या दशकानंतर पहिल्यांदाच चीनला लागून असलेल्या सीमेवर झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत.
१९६२ सालच्या भारत-चीन युद्धानंतर सीमेवर तणाव निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या. १९७५ साली चीनला लागून असलेल्या सीमेवर गोळीबार झाला. त्यामध्ये भारताचे चार जवान शहीद झाले होते. त्यानंतर मात्र कधीही भारताच्या बाजूला एकही जवान शहीद झाला नव्हता. पण काल रात्री ४५ वर्षानंतर पहिल्यांदाच चीन बरोबर झालेल्या संघर्षात भारताने आपले तीन वीरपुत्र गमावले आहेत. आज तकने हे वृत्त दिले आहे.
मागच्या महिन्याभरापासून पूर्व लडाखमध्ये तणाव आहे. चीन शांततेने चर्चेच्या माध्यमातून आपल्याला वाद सोडवायचा आहे असे सांगत आहे. पण तो मागे हटायला तयार नाही. एप्रिल महिन्यामध्ये नियंत्रण रेषेवर जी स्थिती होती, ती कायम करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.
मागच्या काही दिवसात दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार चिनी सैन्य गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंट १४,१५ आणि १७ ए मधून मागे हटेल असं ठरलं होतं. चिनी सैन्य मागे सरकत देखील होतं. पण पूर्णपणे त्यांना ताबा सोडला नव्हता. काल चिनी सैन्य पूर्णपणे माघारी फिरेल असा निर्णय झाला होता. दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये ठरल्यानंतरही चिनी सैन्याने मागे फिरण्यास नकार दिला. त्यानंतर ही हिंसक झडप झाली.