स्थैर्य,औरंगाबाद,दि २: विनामास्क मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी नियुक्त नागरी मित्र पथक आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्यात सोमवारी सायंकाळी गुलमंडी येथे वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन कुलकर्णी, अतिष यांना अटक झाली. तर तनवाणी फरार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुलमंडी परिसरात तक्रारदार देविदास लक्षम सुसर (वय 42)हे त्यांचे माजी सैनिक नागरिक मित्र पथकासह गुलमंडी परिसरातील टिळकपथ रोडवर विना मास्क फिरणार्या लोकांवर ती कारवाई करत होते. यावेळी किशनचंद तनवणी, सुरेंद्र कुलकर्णी आणि आतीस जोजरे यांनी सुसर यांना कारवाई करू नका, असे सांगितले. यावेळी वाद वाढला आणि आरोपींनी सुसर आणि त्यांच्या साथीदारांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी मोठ्या संख्येने व्यापारी जमा झाले. त्यापैकी काही जणांनी मध्यस्थी करून पथकाला तेथून जाण्यास सांगितले. वाढती गर्दी पाहून कर्मचारी निघून गेले.
पथकातील कर्मचाऱ्यांची भाषा दादागिरीची- तनवाणी
यावेळी किशनचंद तनवाणी म्हणाले की, प्रत्येकाने मास्क घातलाच पाहिजे. पण हे पथक विशिष्ट ठिकाणीच कारवाई करत आहे. त्यातही काही जणांना सोडून दिले जात आहे. व्यापाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, पथकातील कर्मचाऱ्यांची भाषाही दादागिरीची असते. हातगाडीचालक, व्यापाऱ्यांकडून पावती न देता दंडवसुली होत आहे. मनपा अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. मनपाचा ध्वज आणि अंबर दिवा लावलेल्या चारचाकीतून हे पथक कसे फिरते, असाही व्यापाऱ्यांचा सवाल होता. दिव्य मराठी प्रतिनिधीने फोटो काढल्याचे लक्षात येताच क्रांती चौक पोलिस ठाण्यासमोरून चारचाकी पिटाळण्यात आली.