फलटण शहरात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; १४ जणांना अटक, एका अल्पवयीन मुलाचाही समावेश

जिंती नाका परिसरातील घटना; पोलिसांच्या समोरच एकमेकांवर दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


स्थैर्य, फलटण, दि. ०७ सप्टेंबर : शहरातील जिंती नाका परिसरात काल (दि. ६) दुपारी दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यासमोरच एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार संदिप दिलीप लोंढे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जिंती नाका येथे शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिवशक्ती आणि जयभवानी तरुण गणेश मंडळाचे कार्यकर्ते आपापसात वाद घालत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना वाद न घालण्याविषयी आणि तक्रार असल्यास पोलीस स्टेशनला येऊन देण्याविषयी समजावले.

पोलिसांनी समजावून सांगत असतानाही, कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही क्षणांतच प्रकरण चिघळले आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला.

याप्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. यामध्ये विशाल पांडुरंग माळी, देविदास बापु माळी, संपत भरत माळी, अजय पांडुरंग माळी, रंगराव भरत माळी, अमर राजु माळी, नेताजी प्रकाश माळी, प्रकाश काळुराम माळी, अमोल आकाराम मोरे, रमेश संजय माळी, अजय रघुनाथ माळी, सुशांत सुनिल जुवेकर, शंकर रामराव जुवेकर यांच्यासह एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तर अजय संजय जाधव हा आरोपी पाहिजे असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या सर्वांवर भारतीय न्याय संहिता कलम १९४(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलीस हवालदार अश्विनी चव्हाण करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!