
स्थैर्य, सातारा, दि. 29 सप्टेंबर : तीन दिवस संततधार पडणार्या पावसामुळे सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांची झाली आहे. शहरातील मंगळवार तळे ते नागाचा पार रस्त्यावरील ही रस्त्याची दयनीय अवस्था पाहिल्यावर यातून जायचे कसे आणि पादचार्यांनी चालायचे कसे असाच प्रश्न पडत आहे. संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. इच्छितस्थळी जाण्यासाठी खड्डे चुकवत सातारकरांना दररोज कसरत करावी लागत आहे. मात्र, या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शहरवासीयांना पावसाळा संपायची वाट पाहावी लागणार आहे.
शहराला जोडणारे दोन मुख्य रस्ते असून त्याला समांतर अदालतवाडा तसेच राधिका रोडवरील या दोन रस्त्यांवरही नेहमी वर्दळ असते. राधिकारोडवर रस्त्यावरील खड्डयांची तात्पुरती डागडुजी केली असली तरी दुचाकी वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहन चालविताना त्रास होत आहे.
खड्ड्यात दुचाकी आदळल्याने त्याचा हादरा मान, मणक्याला बसतो. यामुळे मानेचे आणि मणक्यांच्या आजारात वाढ होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. वारंवार हादरे बसल्याने हाता-पायांना मुंग्या येणे, हाता-पायातील ताकद कमी होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. वृध्दांची हाडे ठिसूळ असतात, त्यातच दुचाकीवरून प्रवासादरम्यान जोराचा हादरा बसल्यास त्यांची हाडे दुभंगण्याची शक्यता असते.

