
स्थैर्य, फलटण, दि. ८ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजे गटाच्या प्रभागनिहाय मुलाखतींना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. प्रभाग क्रमांक ८ मधून (नागरिकांचा मागास प्रवर्ग) विशाल तेली यांच्या उमेदवारीसाठी प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने एकवटल्याचे दिसून आले. या मुलाखतीदरम्यान प्रभागातील व्यावसायिक, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
विशाल तेली यांनी या मुलाखतीदरम्यान आपल्या उमेदवारीची भूमिका मांडली. आपल्या कार्यातून आणि सामाजिक बांधिलकीतून आपण प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्यास सक्षम असल्याचे त्यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राजे गटाच्या नेतृत्वा निदर्शनास आणून दिले. विशाल तेली हे केवळ नावापुरते समाजसेवक नसून कामातून दिसणारे कार्यकर्ते आहेत, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या सुमारे ५० वर्षांत तेली समाजातील कोणालाही फलटण नगरपरिषदेत प्रतिनिधित्वाची संधी मिळालेली नाही, याकडे बैठकीत उपस्थित नागरिकांनी लक्ष वेधले. आता समाजातील कार्यकर्त्यांनाही नेतृत्वाची संधी मिळावी, यासाठी या प्रभागातून तेली समाजाचा उमेदवार उभा राहावा आणि त्याला राजे गटाने मान्यता द्यावी, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. सुमारे ५० वर्षांची प्रतीक्षा आता संपणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विशाल तेली हे तेली समाजाचे अध्यक्ष असून शहरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये ते नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी अनेक जनहिताच्या कामात पुढाकार घेतला आहे. युवक वर्गात त्यांची विशेष लोकप्रियता असून त्यांच्या आयोजन कौशल्यामुळे आणि तळागाळातील संपर्कामुळे ते युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
राजे गटाच्या मुलाखतीनंतर प्रभाग क्रमांक ८ मध्ये उमेदवारीसंदर्भात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशाल तेली यांचे नाव सर्वत्र चर्चेत असून कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या नेतृत्वाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. राजे गटाने त्यांना उमेदवारी दिल्यास प्रभागासाठी एक सक्षम पर्याय उपलब्ध होईल आणि विजय खेचून आणण्याची त्यांच्यात क्षमता आहे, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग ८ मधील लढत चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राजे गट कोणाला उमेदवारी देणार, यावर या प्रभागातील पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत. विशाल तेली यांच्यासारख्या तरुण आणि जनसंपर्क असलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळाल्यास त्याचा फायदा राजे गटाला होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला उत्साह आणि विशाल तेली यांच्या पाठीशी उभे राहण्याचा केलेला निर्धार पाहता, आगामी काळात या प्रभागातील निवडणूक रंगतदार होणार हे नक्की. राजे गटाच्या अंतिम निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

