दहा दिवसांत तब्बल 600 च्या वर बाधित
स्थैर्य, सातारा, दि. १२ : राज्याबरोबरच सातारा जिल्हय़ातही करोना संसर्गाचा वेग मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. जिल्हय़ात 1 जुलै रोजी असणारा 1045 हा बाधितांचा आकडा केवळ 10 दिवसांत 1601 वर पोहोचल्याने जिल्हावासियांना धडकी बसली आहे. तसेच या काळात तब्बल 25 बळी वाढल्याने प्रशासनाने कडक पावले उचलत दुपारी 2 नंतर सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश काढले आहेत. सातारा, फलटण शहरासह जिल्हय़ातील दहा गावे हॉटस्पॉट ठरली असून या गावातील साखळय़ा तोडण्याचे प्रशासनापुढे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, जिह्यात विविध रुग्णालयात आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 60 नागरिकांना शनिवारी दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्हय़ात गेल्या दहा दिवसांपासून करोनाचा कहर सुरूच आहे. दररोज 50 ते 100 बाधित रुग्णांमुळे करोना मुक्तीकडे वाटचाल करणारा सातारा पुन्हा झेपावला आहे. बाधितांची संख्या कमी करायची असेल तर लॉकडाऊन कडक हवा अशीच सगळय़ांची भावना झाली होती. प्रशासनाने हाफ लॉकडाऊन करुन त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. नागरिकही प्रशासनास सहकार्य करत आहेत.
जिल्हय़ातील तब्बल 403 गावे करोना ग्रस्त झाली असून यातील दहा गावे हॉटस्पॉट ठरली आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील जिहे गावात तब्बल 56 बाधित रुग्ण आहेत. त्याखालोखाल शिरवळ, तारुख, म्हासोली, रामवाडी, मलकापूर, तुळसण, चोरगेवाडी, पसरणी ही गावे आहेत. सुरुवातीला हॉटस्पॉट ठरलेली वनवासमाची आजमितीला कोरोनामुक्त आहे.