औंधनजीकचे रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक धुळी प्रदुषणाने त्रस्त; ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे काम रखडले


स्थैर्य, औंध, दि.२३: औंध ते पुसेगाव रस्त्यावरील औंध गावानजीकचे रस्त्याचे काम रखडल्याने या भागातील नागरिक रहिवाशांना मोठया प्रमाणात धुळीच्या प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत असून संबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे मागील एक ते दिड महिन्यापासून हे काम खोळंबले असून याबाबत संबंधित विभागाने लक्ष घालून या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते गणेश चव्हाण व ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा याभागातील त्रस्त ग्रामस्थ ,रहिवाशांनी दिला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, औंध ते पुसेगाव या रस्त्याचे काम मागील सुमारे दिड वर्षांपासून सुरू आहे. यामध्ये रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण,गटर्स दुरूस्ती ,पुल दुरुस्ती आदी कामे सुरू आहेत. मात्र मागील एक महिन्यापूर्वी पासून औंध गावानजीकच्या पुसेगाव पूल ते नवीन बसस्थानक चौक त्याच बरोबर केदारलिंग मंदिरापर्यंतचा रस्ता खोदून ठेवल्याने व अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघात घडू लागले आहेत.

त्याचबरोबर रस्त्यावर ठिकठिकाणी दगडे मांडली आहेत ,खडी उकलली आहे तसेच वाहनांची वर्दळ वाढल्यानंतर धूळ ही मोठ्या प्रमाणात उडत आहे. त्यामुळे औंधनजीकचा पुसेगाव पूल ते केदारलिंग परिसरातील रस्त्यालगत असणाऱ्या सुमारे दिडशे ते दोनशे कुटुंबांना धुळीचा व वायू प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत संबंधित ठेकेदार व कामगारांना वारंवार सांगूनही मागील एक महिन्यापासून कोणीही त्याकडे लक्ष देत नाही अशी परिस्थिती आहे. याबाबत प्राप्त माहिती नुसार संबंधित ठेकेदाराची बिले अडकल्यामुळे हे काम रखडले असल्याची चर्चा परिसरात आहे .मात्र काम बंद पडल्याने धुळीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडू लागले आहेत. महिला, लहान मुले नागरिकांना ध्वनी, वायू प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे .

याबाबत हे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा संबंधित ठेकेदार व अधिकारी वर्गाच्या कारभाराविरोधात आंदोलन छेडावे लागेल अशी माहिती या भागातील रहिवासी गणेश चव्हाण व नागरिकांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!