स्थैर्य, सातारा, दि. १८ : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर दिनांक 17 जुलै ते 26 जुलै जिल्हा बंद असणार आहे. कर्मचारी आणि नागरिकांनी नियम काटेकोरपणे आणि जबाबदारीने पाळावेत. जिल्हा परिषदेमध्ये रूग्ण आढळल्यावर पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे.
रुग्णांची वाढती संख्या पाहता 17 जुलै ते 26 जुलै सातारा जिल्हा कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिक तसेच कर्मचारी अशा सर्वच घटकांनी विशेष काळजी घ्यावी. अत्यंत निकडीचे आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. सातत्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वारंवार कमीत कमी वीस सेकंद एवढा वेळ सॅनिटायझर अथवा साबणाने हात धुणे” या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात. जिल्हा परिषदेची संपूर्ण यंत्रणा याबाबत सतर्क असून नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे टाळेबंदीच्या काळात सर्व नियम पाळावेत. ज्या वेळात दुकाने उघडी आहेत. तेवढ्याच वेळात आणि कुटुंबातील ठराविक एकाच व्यक्तीने बाहेर पडावे. खासगी आस्थापना, सरकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी नागरिकांनी अजिबात गर्दी करू नये. स्वतः कुटुंबाची काळजी घ्यावी. म्हणजे पर्यायाने समाजात संपूर्ण सुरक्षितता निर्माण होईल. विषाणुची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी कटाक्षाने पाळणे अत्यंत निकडीचे बनले आहे. आरोग्य विभाग, पोलीस, महसूल असे सर्वच विभाग संपूर्णपणे सतर्क असून सतत समाजप्रबोधन करीत आहेत. त्याला नागरिकांनी साथ द्यावी. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया, दिव्यांग नागरिक अशा घटकांची विशेष काळजी घेणे गरजेचे असून नागरिकांनी घरगुती उपाय देखील अवलंबावे. केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने तसेच राज्य सरकारनेदेखील आयुर्वेदिक, होमिओपॅथिक उपाय आणि घरगुती काळजी सोप्या पद्धतीने कशी घ्यावी याचे सुंदर मार्गदर्शन केले आहे. त्याप्रमाणे नागरिकांनी कौटुंबिक पातळीवर हे उपाय अवलंबावे. प्रत्येक गावात जी ग्राम सुरक्षा समिती आहे, त्या समितीला तसेच; शहरांमध्ये प्रभाग समितीला नागरिकांनी मनापासून सहकार्य करावे. अखेर हा सामूहिक प्रयत्न आहे. त्यातूनच यश मिळणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोर नियोजन केले जात आहे. उपाय योजना आणि त्याच्यासोबत जनप्रबोधन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या पातळीवर सुद्धा जिल्हा परिषद कसोशीने प्रयत्न करत असून शेकडो प्रकारची माहिती पत्रके आणि पुस्तके छापून लाखो प्रती जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत. सुशिक्षित नागरिक तसेच सुशिक्षित तरुण यांनी जबाबदारीने प्रबोधनाला साथ द्यावी. स्वतःसह कुटुंबाची काळजी घ्यावी आणि संपूर्ण गावाला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी कळतील आणि त्यांच्या पर्यंत पोहचतील असा प्रयत्न करावा असे नम्र आवाहन करावेसे वाटते.
“एकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ” अशी आपली भारतीय संस्कृती आहे. आपला जिल्हा जबाबदार नागरिकांचा जिल्हा आहे. सर्व नागरिक प्रशासनाला सहकार्य करतील, अशी अपेक्षा नव्हे तर खात्री आहे.