कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्‍या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी जबाबदारीने वागावे – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ जुन २०२१ । पुणे । जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील कोरोना रुग्णांची सद्याची संख्या पाहता या आठवड्यातील निर्बंधच पुढील आठवड्यात कायम राहतील. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावे, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सील हॉल येथे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री.वळसे पाटील बोलत होते. यावेळी खासदार गिरीष बापट, खा. श्रीरंग बारणे, खा. श्रीमती सुप्रियाताई सुळे, खा. ॲड. वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, आमदार ॲड. अशोक पवार, आ.चेतन तुपे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ.सुभाष साळुंके आदींसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री. वळसे पाटील म्हणाले, जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तसेच नियोजन करुन पेसा भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे. तसेच दर पंधरा दिवसांनी रॅपिड ॲन्टीजन टेस्ट ( RAT) बंधनकारक करण्यात आलेली आहे. दिव्यांग नागरिकांचे लसीकरण सुरु आहे. संभाव्य तिसऱ्‍या लाटेचा विचार करता प्रशासनाने तयारी केलेली आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून काळजी घेण्याची गरज असल्याचे श्री. वळसे पाटील म्हणाले.

प्रशासनाने म्यूकरमायकोसीस रुग्णांची जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे. डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता प्रशासनाने व नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे. पर्यटनाला व सार्वजनिक ठिकाणी ‍जाण्याचे टाळावे. विवाह समारंभात नागरिकांची होणारी गर्दी लक्षात घेता, हॉटेल व्यवस्थापन व मंगल कार्यालयांनी प्रशासनाच्या नियमांची अंमलबजावणी करावी. जे नियमांची अंमलबजावणी करणार नाही त्यांच्यावर पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. तिसऱ्‍या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालये पंधरा जुलै पर्यंत बंदच ठेवण्यात येतील. सद्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांचे बिल व औषधांचे बिल या विषयी तक्रारी येतात. त्यामुळे प्रशासनाने काटेकोरपणे लेखापरिक्षण करण्याच्या सुचनाही श्री. वळसे पाटील यांनी दिल्या.

यावेळी डॉ. सुभाष साळुंखे यांनी सांगितले की, तिसऱ्‍या लाटेचा धोका लक्षात घेता सुपर स्प्रेडर ठरणाऱ्‍यांचे जास्तीत जास्त लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणे, जबाबदारीने वागणे यामुळे तिसऱ्‍या लाटेची तीव्रता कमी करता येईल.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव व उपाययोजना तसेच तिसऱ्‍या लाटेच्या दृष्टीने केलेली तयारी लसीकरण याबाबतची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हयातील कोरोना रुग्णस्थिती व लसीकरणाबाबत माहिती दिली.

यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, खा. वंदना चव्हाण, खा. गिरीश बापट, खा. श्रीरंग बारणे, आमदार ॲङ अशोक पवार, आ. चेतन तुपे यांनीही महत्त्वाचे विषय मांडले.


Back to top button
Don`t copy text!