स्थैर्य, फलटण, दि. ११: फलटणकरांनो वैध कारण असेल अथवा प्रवासाचा पास असेल तर आणि तरच घराबाहेर पडा. विनाकारण भटकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यास वाहन जप्त करून कठोर कारवाई केली जाईल. आज दि. ११ मे २०२१ रोजी सकाळ पासून फलटण शहरात विनाकारण फिरणारी २७ वाहने जप्त करण्यात आलेली आहेत. तर फलटण शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ८ दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. तरी फलटण शहामध्ये विनाकारण फिरू नये, असे आवाहन फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केलेले आहे.
कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. वैध कारण असेल अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठीचा ई-पास काढला असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केलेले आहे.
फलटण शहरातील प्रमुख चौकात पोलिसांच्या विविध तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. फलटण शहरामध्ये संचारबंदीची अंमलबजावणी कठोरपणे केली जात आहे. विनामास्क फिरणाऱ्या तसेच अन्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करीत आहेत. यापुढे जाऊन शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांच्या मोटारसायकली जप्त करीत आहेत. नागरिकांनी घरात, सुरक्षित राहावे, असे आवाहन फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.