दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । सातारा । शासनाने तात्काळ पुनर्वसित जमीन द्यावी या मागणीसाठी अहिर,, ता. महाबळेश्वर येथील चार नागरिकांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर अर्धनग्न आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. भर पावसात झालेल्या या आंदोलनाची या वेळी एकच चर्चा झाली.
आंदोलकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, अहिर, ता. महाबळेश्वर येथील आम्ही रहिवासी असून कोयना प्रकल्पामुळे बाधित झालेले प्रकल्पग्रस्त आहोत. कोयना धरणाची निर्मिती होऊन ६० वर्ष झाली तरीही आम्हास अजून वडिलोपार्जित हक्काची पुनर्वसनाची जमीन मिळालेली नाही. जमीन मिळण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही आम्हाला प्रशासनाकडून अत्यंत हिन दर्जाची वागणूक मिळत आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर अर्धनग्न आंदोलन करीत असून बुधवार दि. १० ऑगस्ट रोजी मुंबई येथे मंत्रालयासमोर अशाच अवस्थेत आक्रोश आंदोलन करणार आहोत.
दि.१५ ऑगस्ट रोजी आम्ही जलसमाधी आंदोलन करणार असल्याची कल्पना यापूर्वीच एका निवेदनाद्वारे प्रशासनाला दिली आहे. पुनर्वसित जमीन मिळण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा झाली मात्र त्यांच्याकडून दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. उलट आमच्यावर दबाव आणू नका, अशी उद्धट भाषा आम्हाला वापरली जात आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. प्रसिद्धी पत्रकावर शिवराम गोविंद संकपाळ, नितीन पांडुरंग संकपाळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.