स्थैर्य, फलटण, दि. २७ : कोरोना नियंत्रणासाठी नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात राबविण्यात आलेल्या विविध उपाय योजना उपयुक्त ठरत असताना नगरपालिकेने 85 हजार रुपये खर्च करुन घेतलेल्या मशिनरीच्या आधारे शहरातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य विषयक सर्वेक्षण करण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे.
तपासणीमध्ये कमी/जास्त प्रमाण
आढळल्यास वैद्यकीय तपासणी होणार
नगर पालिकेने थर्मल स्कॅनर, पल्सऑक्सिमीटर खरेदी केले असून नगरपरिषदेच्या वॉर्ड ऑफिसरकडे दिले आहेत. यापैकी थर्मल स्कॅनर मशीनद्वारे नागरिकांच्या शरिरातील तापाचे प्रमाण, पल्स ऑक्सिमीटरद्वारे नागरिकांच्या हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासता येणार असून नॉर्मल व्यक्तीच्या शरीरातील तापमान, हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण किती असते याची माहिती या वॉर्ड ऑफिसरला देण्यात आली असून एकाद्या नागरिकांच्या शरीरातील हे प्रमाण कमी/जास्त आढळल्यास अशा नागरिकांना तातडीने वैद्यकीय अधिकार्यांकडे पाठवून त्यांची तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी सांगितले.
आरोग्य अधिकारी वैद्यकीय सेवेसाठी सज्ज राहणार
अशा प्रकारे वैद्यकीय सर्वेक्षण केल्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी/कर्मचारी सर्व 60/65 हजार नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात गुंतून न पडता संशयीत रुग्णांची तपासणी करुन त्यांना तातडीने आवश्यक वैद्यकीय उपचार सुरु करणे शक्य होणार असल्याचे मुख्याधिकारी काटकर यांनी सांगितले.
नोंदीमध्ये तफावत आढळल्यास वैद्यकीय सल्ला घेणार
संपूर्ण शहरात वॉर्ड ऑफिसर व त्यांचे सहकारी या पद्धतीने आरोग्य तपासणी करुन त्याच्या नोंदी ठेवत आहेत, दुसर्या राऊंडच्यावेळी तपासणी करताना संबंधित नागरिकांचे आरोग्य विषयक नोंदी मध्ये तफावत आढळल्यास त्याबाबतही वैद्यकीय अधिकार्यांचा सल्ला घेतला जाणार असल्याचे मुख्याधिकारी काटकर यांनी सांगितले आहे. प्रामुख्याने होम क्वारंटाइन व्यक्तीसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे.