स्थैर्य, फलटण, दि. ०५ : सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. साताराचे प्रभारी जिल्हाधिकारी शेखर सिंह व प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू केलेले आहेत. सध्या फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण हे मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळ येत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून पंचायत समिती गण निहाय भरारी पथके हि तयार करण्यात आलेली आहेत. भरारी पथके नेमून दिलेल्या पंचायत समिती गणामध्ये कार्यरत राहणार आहेत, अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी दिली.
भरारी पथक हे ज्या गावामध्ये जाईल, त्या गावामधील ग्रामसेवक हे त्या ठिकाणी बरोबर असणार आहेत. भरारी पथक हे संबंधित गावामध्ये ग्राम दक्षता समितीच्या माध्यमातून कोरोना बाबतच्या उपाययोजना रोगय रीतीने राबवण्यात येत आहेत कि नाही या बाबत खात्री करणार आहे. भरारी पथकास नेमून दिलेल्या गावामध्ये चेहऱ्यावर, तोंडावर व नाकावर मास्क नसलेल्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करणार आहे. खाजगी जागेत किंवा सरकारी जागेमध्ये थुंकलेले आढळ्यास अश्या व्यक्तींवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, अशी हि माहिती गटविकास अधिकारी डॉ. सौ. अमिता गावडे – पवार यांनी दिली.