नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसमवेत नागरिकांचे शुक्रवारी चर्चासत्र

बालाजी ट्रस्टचा उपक्रम; फक्त निमंत्रितांचाच सहभाग


स्थैर्य, सातारा, दि. 24 नोव्हेंबर : सातारा पालिकेला ऐतिहासिक वारसा असून, होणार्‍या निवडणुकीत नागरिकांना नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे. हा नगराध्यक्ष कसा असावा, त्याचा विकासाचा दृष्टिकोन काय आहे, हे जाणून घेण्यासाठी शुक्रवारी (ता. 28) सकाळी 11 वाजता बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने नागरिकांसमवेत या उमेदवारांचे चर्चासत्र आयोजित केल्याची माहिती राजेंद्र चोरगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
शहर विस्तारत असून, सद्यःस्थितीत 25 प्रभागांतून 50 नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे. हे ज्या पालिकेत जाऊन सातार्‍याचा कारभार पाहणार आहेत, तिचा वार्षिक अर्थसंकल्प 650 कोटी रुपयांचा आहे. इतक्या मोठ्या पालिकेची जबाबदारी पेलण्याची क्षमता होणार्‍या नगराध्यक्षामध्ये आहे का, याची चाचपणी व त्याचे कर्तृत्व तपासणे सातारकरांची जबाबदारी आहे. आपल्या मतांवर निवडून जाणार्‍या
नगराध्यक्षाला दरमहा मानधन, तसेच इतर सुविधा तहहयात मिळणार असून, तो पैसा जनतेच्या करातील असणार आहे. यामुळे शहराच्या, जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठीचे नियोजन करणे व ते करण्यासाठी प्रशासनास सुचविणे यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आहोत. प्रथम नागरिक म्हणून ति निवडून जाणारा उमेदवार सक्षम असणे आवश्यक असल्याने मतदार म्हणून आपली जबाबदारी महत्त्वाची आहे. निवडीनंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये म्हणून बालाजी ट्रस्ट आणि सवयभानच्या माध्यमातून निवडणुकीसाठी रिंगणात असणार्‍या योग्य उमेदवाराची छाननी करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यात सर्व उमेदवारांनी सहभागी होण्यास संमती दर्शवली आहे.चर्चासत्रात नगराध्यक्षपदाचा उमेदवार, समर्थक आणि विविध क्षेत्रातील 100 जणांना निमंत्रित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील होणार असल्याची माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!