नवीन वाळू धोरणाच्या यशस्वी अंमबजावणीसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२३ । नाशिक । राज्य शासनाने नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवीन वाळू धोरण लागू केले आहे. या नवीन वाळू धोरणाच्या यशस्वी अंमबजावणीसाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले आहे.

चांदोरी तालुका निफाड येथील गोदावरी नदी खोलीकरण व शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन प्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., नाशिक अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पाराधे, मालेगाव अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, निफाड प्रांताधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण, निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, नवीन वाळू धोरणामुळे अवैध वाळू उत्खनन व विक्रीवर नियंत्रण आणण्यासाठी मदत होणार आहे. तसेच यामुळे सामान्य नागरिकांना या धोरणानुसार 600 रूपये ब्रास प्रमाणे वाळू मिळणार आहे. वाळू खरेदी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. तसेच घरकुलांसाठी लागणारी 5 ब्रास वाळू नवीन धोरणानुसार मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे ही महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

नदीपात्रातील काढण्यात आलेला गाळ शेतकऱ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार आहे. या नवीन धोरणामुळे बेकायदेशीर वाळू विक्रीला आळा बसणार आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकारी यांनी या नवीन वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर राहावे, अशा सूचनाही महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले, राज्य शासनाने लागू केलेल्या नवीन वाळू धोरणाच्या माध्यमातून नागरिकांना वाळू स्वस्त दरात उपलब्ध होण्यासोबतच पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबण्यासाठी मदत होणार आहे. त्याचप्रमाणे पावसाळ्यात गोदावरी नदीला येणाऱ्या पाण्यामुळे चांदोरी, सायखेडा या भागांमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण होते. या ठिकाणी असलेल्या नदी खोलीकरणामुळे नदीपात्रात साठलेला गाळ काढल्याने पुर परिस्थिती नियंत्रणात येणार आहे. या धोरणामुळे शासकीय वाळू केंद्राच्या माध्यमातून घर बांधकाम व्यवसायिक, मोठे प्रकल्पांचे बांधकाम यासाठी देखील वाजवी दरात वाळू उपलब्ध होणार आहे. शासकीय वाळू विक्री केंद्रात वाळू खरेदी धारकांना ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे, असे ही विभागीय आयुक्त श्री. गमे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला शासकीय वाळू विक्री केंद्राचे लोकार्पण महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मधुकर खेलूकर, शाम वायकांडे व जीवन आंबेकर यांना प्रातिनिधीक स्वरूपात ऑनलाइन वाळू वाहतूक पासचे वितरण मंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार दिलीप बनकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नवीन वाळू धोरणाची माहिती दिली. तर आभारप्रदर्शन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!