दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा शहरातील सदर बझार येथील बिस्मिल्लाह आणि मदिना या दोन हॉटेलमध्ये बीफ विक्री केली जाते. गेल्या महिन्यात सातारा नगर पालिकेने कारवाई करत ही दोन्ही हॉटेल सील केली होती. सातारा नगरपालिकेने अटी- शर्तीचे नियम घालून ही हॉटेल संबंधितांकडून लेखी लिहून घेत पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. या बीफ हाॅटेल विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झालेले आहेत.
या हॉटेलमध्ये सातारा शहर आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात बीफ खवय्ये येत असतात. रात्रीच्या वेळी मद्यपान करून या ठिकाणी गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. या ठिकाणी येणाऱ्या मद्यपींकडून आरडाओरडा करत स्थानिक नागरिकांच्या घराच्या परिसरात लघुशंका केली जाते. त्यामुळे महिला वर्गामधून संताप व्यक्त केला जात आहे. या बाबी लज्जास्पद असून महिलांनी संबंधित हॉटेल मालकाची कान उघडणी करत हॉटेल समोरच गोंधळ घातला. यावेळी काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पालिका प्रशासनाने आणि पोलिसांनी हे हॉटेल तात्काळ बंद करून टाकावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. या परिसरात अजूनही छुप्या पद्धतीने जनावरांची कत्तल केली जात असून जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी सदर बझारच्या बेकायदेशीर कत्तलखान्याकडे लक्ष घालावे. अन्यथा मोठा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.