स्थैर्य, कोरेगाव, दि. १० : गेले वर्षभर बंद असलेल्या फिल्ट्रेेशन प्लँटमुळे कोरेगाव शहरात सध्या दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. आज संतप्त नागरिकांनी आक्रमक पावित्र घेत नगराध्यक्षांच्या दालनातच प्रतीकात्मक महाळ घालून कोरेगाव नगरपंचायतीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविण्यात आला.
कोरेगाव शहराला पाणीपुरवठा करणार्या एम.आय.डी.सी. व रेल्वे स्टेशन येथील दोन्हीही जल शुद्धीकरण प्रकल्प नादुरुस्त अवस्थेत असून मागील एप्रिल महिन्यापासून सोनेरी ग्रुप व कोरेगाव शहरातील विविध संघटना, नागरिकांनी नगरपंचायतीला वारंवार निवेदन देवून फिल्ट्रेशन प्लँट दुरुस्तीसाठी जनरेटा उभारला होता. मागील मे महिन्यापासून नागरिक व नगरपंचायतीत वारंवार संघर्षही पेटला होता. सोनेरी ग्रुपने नगरपंचायतीला घेराव घालून फिल्ट्रेशन प्लँट तत्काळ दुरुस्तीसाठी मागणीही केली होती. त्यावर निविदा प्रक्रिया सुरू करून फिल्ट्रेशन प्लँट दुरुस्ती सुरू करत असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने सांगितले होते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातत्याने गढूळ व माती मिश्रित पाणी नागरिकांना नळाद्वारे मिळत असून त्यावर कोरेगाव शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. आज सकाळी सोनेरी ग्रुपच्या सदस्यांसह शहरातील काही नागरिक निवेदन घेवून नगरपंचायतीला जाब विचारण्यासाठी गेले होते. बराच वेळ कोणीही निवेदन घेण्यासाठी येत नसल्याने सोनेरी ग्रुपच्यावतीने नगराध्यक्षा रेश्मा कोकरे यांच्या दालनात, रिकाम्या खुर्चीसमोरच प्रतीकात्मक महाळ घालून दूषित पाण्याने ग्रस्त झालेल्या व मागील काही दिवसांत मृत्युमुखी पडलेल्या कोरेगावमधील नागरिकांच्या स्मृतीस नैवेद्य दाखवून आदरांजली वाहण्यात आली.
नगरपंचायतीचा एक सुद्धा जबाबदार पदाधिकारी, नगरसेवक निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित न राहिल्याने नागरिकांनी त्यांचा निषेध व्यक्त केला. दरम्यान, आंदोलकांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्या दालनात जावून आपले निवेदन सादर केले. त्यांनी तत्काळ नगरपंचायत अभियंता काकडे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख प्रताप बुधावले यांना बोलावून घेत दूषित पाणी पुरवठ्याबाबत जाब विचारला. तुरटी पुरवठादाराचे मागील बिल का आदा केले नाही अशी विचारणा करत त्यांनी संबंधितांवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले. तत्काळ तुरटी, ब्लिचिंग उपलब्ध करून उद्याचा पाणी पुरवठा शुद्ध करून देण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना जाग्यावरच दिले. आंदोलकांची भूमिका समजावून घेत मी नगरपंचायतीच्या कामकाजात निश्चित सुधारणा करून दाखवेन, अशी ग्वाही दिली.
आंदोलकांच्यावतीने सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे, अजित बर्गे, अमर देशमुख, सूरज पवार, कविता माने, रविराज बर्गे, पवन भोईटे, सम्राट थोरात, साहिल तिवाटणे व महेश उंडाळे यांनी संबंधितांवर प्रश्नांचा भडिमार केला. सोनेरी ग्रुपने घातलेल्या या प्रतीकात्मक महाळाची चर्चा आज कोरेगावात जोरदार सुरू होती.