दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२३ | फलटण |
कोळकी येथील बुवासाहेब नगरमध्ये गणेश मंदिर ते शेवटपर्यंतचा रस्ता डांबरीकरणाबाबत शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन तक्रार गावातील एका नागरिकाने केली होती. त्यानुसार अद्यापपर्यंत हा रस्ता पूर्ण डांबरीकरण न झाल्याने अर्जदार नागरिकाने ग्रामविकास अधिकार्यास हा रस्ता ३१ मार्चपर्यंत डांबरीकरण करावा, नाही तर या रस्त्याकडेला टाकलेला मुरूम स्वखर्चाने उचलून ग्रामपंचायतीसमोर टाकण्यात येईल, असा इशारा दिला आहे.
याबाबत माहिती अशी, कोळकी येथील बुवासाहेब नगरमधील रस्ता डांबरीकरणाबाबत कोळकीचे रूपेश विजय देवरे यांनी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन तक्रार केली होती. त्यास कोळकीच्या ग्रामविकास अधिकार्याने गटविकास अधिकार्यांना लेखी खुलासा देऊन ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध झाल्यानंतर हा अर्धवट डांबरीकरण झालेला रस्ता पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले होते व ऑनलाईन अर्ज निकाली काढावा, असे म्हटले होते. मात्र, त्या पत्रानुसार आजअखेर रस्ता डांबरीकरण न झाल्यामुळे अर्जदार देवरे यांनी हा रस्ता ३१ मार्चपर्यंत पूर्ण केला नाही तर १ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीने या रस्त्यावर जो काही मुरूम टाकून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, तो सर्व मुरूम स्वखर्चाने उचलून ग्रामपंचायतीसमोर टाकण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायतीची राहील, असा इशारा दिला आहे.