सदोष मतदारयादीमुळे आरक्षण फेरबदल; अंतिम यादीनंतरच आरक्षण सोडत घ्या – काँग्रेसची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. 15 ऑक्टोबर : फलटण नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना आणि सदोष मतदारयाद्यांवरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होण्याआधीच आरक्षण सोडत निश्चित करणे हे लोकशाहीला धरून नाही, असा आक्षेप घेत मतदारयादी अंतिम झाल्यानंतरच आरक्षणाची प्रक्रिया पुन्हा राबवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासंदर्भातले निवेदन मुख्याधिकारी निखिल जाधव यांना सादर करण्यात आले.

फलटण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी या मागणीचे नेतृत्व केले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर काँग्रेसने यापूर्वीच आक्षेप नोंदवले होते, मात्र निवडणूक शाखेकडून त्यावर अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

याशिवाय, प्रसिद्ध करण्यात आलेली प्रारूप मतदारयादी अत्यंत सदोष असून, त्यावर नागरिकांनी मोठ्या संख्येने हरकती दाखल केल्या आहेत. या हरकतींमुळे अनेक प्रभागांमधील मतदारसंख्येत बदल होण्याची शक्यता आहे. काही प्रभागांमध्ये विशिष्ट प्रवर्गातील मतदारांची संख्या वाढू शकते किंवा घटू शकते. त्यामुळे मतदारसंख्याच निश्चित नसताना काढलेली आरक्षण सोडत कायद्याच्या कसोटीवर टिकणारी नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

अंतिम मतदारयादी जाहीर होण्यापूर्वीच आरक्षण सोडत काढल्याने आरक्षणावर थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही प्रक्रिया महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणारी आहे. त्यामुळे प्रशासनाने ही चूक त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

जोपर्यंत हरकती आणि सूचनांवर सुनावणी होऊन मतदारयादी अंतिम होत नाही, तोपर्यंत आरक्षणाची प्रक्रिया थांबवावी. अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतरच पुन्हा नव्याने आरक्षण सोडत काढण्यात यावी, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

हे निवेदन मुख्याधिकारी निखिल जाधव यांना देताना तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शहराध्यक्ष पंकज पवार यांच्यासह जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे, काँग्रेसचे पदाधिकारी धनंजय गोरे आणि सुधीर शिंदे उपस्थित होते. काँग्रेसच्या या मागणीमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.


Back to top button
Don`t copy text!