स्थैर्य, मुंबई, दि. १८ : राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या उपाययोजनांना बळ देतांना सिप्ला या भारतीय बहुराष्ट्रीय औषध कंपनीने ३ कोटी रुपयांची रक्कम राज्य आपत्ती व्यवस्थापन निधीत जमा केली असून नुकताच हा धनादेश कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल चोप्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्रीएकनाथ शिंदे, कंपनीचे कॉर्पोरेट हेड निकिल बासवान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
चोप्रा यांनी कोविड १९ संदर्भात ते करत असलेल्या कामाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी त्यांनी कोविड 19 या विषाणू विरुद्ध लढताना राज्य शासन करत असलेल्या उपायोजनांचे कौतूकही केले. या संपूर्ण कालावधीत औषधनिर्माण कंपन्यांना शासनाने उत्तम सहकार्य केल्यामुळेच कोविड १९ च्या रुग्णांसाठी उपयुक्त आणि जीवनदायी ठरणाऱ्या औषधांचा पुरवठा सुरळित ठेवता आल्याचेही चोप्रा यावेळी म्हणाले.