
स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑक्टोबर : भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेच्या वतीने संघराज अशोक निकाळजे आणि पल्लवी संघराज निकाळजे परिवाराच्या यजमानपदाखाली चिवरदान कार्यक्रम अत्यंत मंगलमय आणि धम्ममय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उल्हासनगर येथील यशोधरा बुद्ध विहाराचे भिक्खू महामोगलायन आणि भिक्खू धम्मरत्न हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यांच्या उपस्थितीत धम्मदेसना आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे फलटण तालुकाध्यक्ष महावीर भालेराव होते. यावेळी जिल्हा संघटक श्रीमंतराव घोरपडे आणि नवनियुक्त तालुका महिला शाखा अध्यक्षा रंजना राजकुमार रणवरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भिक्खू महामोगलायन यांनी निकाळजे परिवारासह उपस्थित सर्व उपासक-उपासिकांना त्रिसरण व पंचशील दिले. यानंतर संघराज निकाळजे परिवाराने भिक्खू महामोगलायन आणि भिक्खू धम्मरत्न यांना चिवरदान करून त्यांचा सन्मान केला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा संघटक श्रीमंतराव घोरपडे म्हणाले, “संघराज निकाळजे आणि त्यांच्या परिवाराने आपल्या धम्मकार्यातून समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. त्यांनी केवळ कार्यक्रम आयोजित केला नाही, तर आपल्या प्रत्यक्ष आचरणातून बुद्ध धम्माचा प्रसार केला आहे. प्रत्येक उपासकाने या परिवाराचा आदर्श घेतला पाहिजे.”
नुकत्याच स्थापन झालेल्या महिला शाखेच्या अध्यक्षा रंजना रणवरे यांनी ‘गाव तिथे महिला शाखा’ हे आपले उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, “महिलांमार्फत प्रत्येक कुटुंबात धम्माचा प्रसार व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या महत्त्वपूर्ण कामात आम्हाला भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेने मदत करावी. निकाळजे परिवाराने उभारलेले चैत्य आणि हा चिवरदान सोहळा अत्यंत प्रेरणादायी आहे.”
अध्यक्षीय भाषणात महावीर भालेराव यांनी बुद्ध, धम्म आणि संघ हेच अंतिम शरण असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “भिक्खू महामोगलायन यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व धम्मप्रसारासाठी एकत्र आलो आहोत. संघराज निकाळजे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमाद्वारे समाजात नवचैतन्य निर्माण केले आहे. तालुक्यात महिला शाखा स्थापन झाल्याने धम्मप्रचार अधिक वेगाने होईल आणि तालुका शाखेचा अध्यक्ष या नात्याने महिला शाखेला संपूर्ण सहकार्य केले जाईल.”
या कार्यक्रमात निकाळजे परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. विज्ञान शाखेतून पदवी संपादन करून ‘SET’ परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल निलाक्षी संदीप निकाळजे हिचा, तसेच विधी शाखेतून पदवी संपादन केल्याबद्दल ॲड. राहुल आबा निकाळजे यांचा भिक्खू महामोगलायन यांच्या हस्ते भारतीय संविधानाची प्रस्तावना व पंचशील ध्वजाची पट्टी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संघराज निकाळजे व परिवाराला तालुका शाखेतर्फे संविधान प्रस्ताविका देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष विठ्ठल निकाळजे, महिला शाखा संस्कार सचिव कल्पना लोंढे, केंद्रीय शिक्षिका करुणा मोहिते, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष रामचंद्र मोरे, संस्कार सचिव बजरंग गायकवाड, कार्यालयीन सचिव चंद्रकांत मोहिते, संघटक विजयकुमार जगताप, संरक्षण सचिव अमोल काकडे, प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे, लक्ष्मणराव निकाळजे, बी. डी. घोरपडे, माणिकराव घोरपडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या धम्म सोहळ्यासाठी आकुर्डी, पुणे येथील तक्षशिला बुद्ध विहाराचे श्रद्धावान उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये रमेश दिलपाक, संपत वाघमारे, हरिभाऊ मेश्राम, हिरामण रामटेके, बाळकृष्ण शिंदे, आनंद कदम, करुणा कदम, यशवंत भालेराव, श्रीधर रोकडे, मधुकर गायकवाड, प्रमोद लोखंडे, अजय जगताप, संतोष उणवणे, सचिन शिवशरण, सुरज रणपिसे, कुलदीप काकडे, अमोल कांबळे, एम. एस. कांबळे, सुदेश जगताप, रवी कांबळे आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संयोजन संग्राम अशोक निकाळजे व पल्लवी संग्राम निकाळजे यांनी केले. या कार्यक्रमामुळे फलटण तालुक्यातील बौद्ध बांधवांमध्ये नवा उत्साह, एकजूट आणि धम्मप्रेरणा निर्माण झाली असून, बुद्धधम्म प्रचाराच्या कार्याला नवसंजीवनी मिळाली आहे.
