स्थैर्य, बारामती, दि. 09 : चिंकारा म्हणजे रिफ्ट व्हॅली ताप आपल्याला मरणदायी यातना देऊ शकतो, यापुढील काळात जे वन्यजीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांच्यामध्ये असणारे विषाणू व जिवाणू दुसऱ्या जीवांच्या शरीरात प्रवेश करतील यात आता अजिबात शंका घेऊ नये.
माणसाला सुधारायचं नाही वाटतं, मात्र शिकऱ्यांनो शिकार बंद करणार नसाल तर अजूनही अनेक विषाणू हल्ले होतील. अजूनही कोरोनाची लाट कसलीच संपलेली नसतानादेखील माणसातले शिकारी आजही वन्य जीवांना मारून खाण्याचे काम करत आहेत.
अगदी रानडुक्कर किंवा इतर प्राण्यांना अत्यंत वाईट पद्धतीने मरण यातना देत आहोत आपण, मात्र लक्षात ठेवा प्रत्येक शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांच्या अंगात असणारे जीवाणू आणि विषाणू माणसापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. हत्तींची संख्या कमी होत असताना जर हत्ती संपलेच तर त्याच्या अगोदर त्यांच्यामध्ये असणारे विषाणू दुसऱ्या जीवांच्या शरीरात प्रवेश करतात आणि मग त्यात पाळीव प्राणी असतील तर आपल्या पर्यंत ते विषाणू सहज पोचतात.
बारामती परिसरात चिंकाराची शिकार झाल्याची घटना वाचून खूप वाईट वाटले मात्र या शिकाऱ्यांना माहितीही नसेल आपल्यामध्ये या हरणांच्या मांसामुळे किंवा रक्तामुळे अनेक घातक विषाणू आपल्या संपूर्ण शरीरात मिसळून आपल्याबरोबर इतर माणसांना सुद्धा याचा संसर्गजन्य रोग पसरू शकतात. चिंकारा मधील एक विशिष्ट विषाणू मुळे प्रचंड ताप येऊन माणसं दगावू शकतात. अहो त्याचा शरीरात असे पर्यंत असे विषाणू त्याला त्रासदायक नसतात, मात्र ते जर आपल्यापर्यंत आले की समजा, आपले मरणच.
आपण हरणाचे मांस खाल्ले किंवा रक्ताचा संबध माणसाशी आला की मग मानवाला क्षमा नाही. आपल्या परिसरात डेंगी, गोचीड ताप, चिकन गुणिया हे आजार वाढत आहेत कारण ऐकलं तर आपला सुद्धा विश्वास बसणार नाही मात्र गवताळ माळरान नष्ट होतायत हे कारण आहे यामागे.
ससे खाणाऱ्या लोकांना सुद्धा मला सांगावेसे वाटते की यामुळे तुलारेमिया हा विषाणू आपल्या शरीरात सहज प्रवेश करू शकतो. रानडुक्कर खात असताना त्या शिकाऱ्यांना माहिती नसते की निपाह हा विषाणू आपल्यापर्यंत आलेला आहे. मात्र तरीही लोक शिकारी करतात हे खूप दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे.
याला समाजाने वेळीच आवर घातला पाहिजे, शिकार होत असताना ज्या लोकांनी जाणीवपूर्वक त्या बारामती परिसरातील शिकाऱ्यांना त्यापासून थांबवले आणि त्यांना पकडण्यात मदत करत आहेत हेच या बदलत्या समाजाचे आशादायक चित्र आहे. मात्र प्रत्येक गावात आणि शहरात घडले पाहिजे कारण शिकारी प्रत्येक गावात आणि शहरात आहेतच मग काही भिकारी आहेत तर काही श्रीमंत आहेत. मात्र दोन्ही प्रकारच्या शिकारी लोकांना न घाबरता आपण सर्वांनी वन्यजीव शिकार व जंगलतोड करण्यापासून थांबविले पाहिजे, ही काळाची गरज आहे.
एक नम्रपणे विनंती आहे की, मानवाला पुढील पिढी निरोगी ठेवायची असेल तर नैसर्गिकरित्या जंगल वाचवण्यासाठी प्रयत्न करावाच लागेल, नाहीतर विनाश अटळ.
नैसर्गिकरित्या जंगल राखण अत्यंत महत्त्वाचे आहे यात परिसरात असणारी माळरान, गवताळ आहे तशी नैसर्गिक ठेवा, अगदी त्यात झाडे सुद्धा लावू नका, पण स्थानिक गवत, काटेरी झुडपं राखून ठेवा, हेच वन्यजीवांना पूरक अधिवास आहेत, जरा समजावून घ्या, नाहीतर शिकारी आणि चुकीची झाडे लावणारी मंडळी एकच, लक्ष्यात ठेवा. हे वाक्य जाणीवपूर्वक लिहीत आहे, शंका असेल ते मला फोन करावा, गैरसमज नकोत.
एकही परदेशी झाड लावू नका तरच आपण नैसर्गिक अधिवास वाचवू शकतो, नाहीतर नाही. आपल्या परिसरातून माळरान व गवताळ प्रदेश नष्ट झाले तर आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही, हे मी जाणीवपूर्वक सांगतोय, वेळीच लक्षात घ्या, नाहीतर रोग लागून मरायला तयार व्हावे. जिथं नैसर्गिक अधिवास मजबुत तिथली माणस मजबुत, नाहीतर विनाशाकडे वाटचाल चालूच आहे आपली, वेगाने.
डॉ महेश गायकवाड, पर्यावरण तज्ञ, बारामती
9922414822.