
स्थैर्य, दि. 27 : करोना व्हायरसमुळे जागतिक स्तरावर चीनची पुरती कोंडी झाली आहे. करोना संकटासाठी जगातील बहुतांश देश चीनला जबाबदार ठरवत आहेत. चहूबाजूंनी चीनवर दबाव वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशातील सैन्य दलाचे प्रशिक्षण अधिक बळकट करण्याचे व युद्धसाठी तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत.
“देशाची स्थिरता आणि सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी देशातील सैन्य दलाचे प्रशिक्षण अधिक बळकट करा व युद्धसाठी तयार राहा” असे निर्देश जिनपिंग यांनी दिल्याचे वृत्त सरकारी माध्यमांनी दिले आहे.
चीनचा सध्या अमेरिका आणि भारताबरोबर वाद सुरु आहे. दोन्ही देशांबरोबर चीनचे संबंध ताणले गेले आहेत. सैन्यबळाचा वापर करुन तैवानचा जबरदस्तीने चीनमध्ये समावेश करण्याची मागणी स्थानिक पातळीवर होत आहे. त्याशिवाय चीन हाँगकाँगमध्ये नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे. अमेरिकेने यावर खूप कठोर प्रतिक्रिया उमटू शकते असा इशाराही चीनला दिला आहे.
एकूणच या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीन कोणासमोर बधणार नाही, हे दाखवून देण्यासाठी जिनपिंग यांनी थेट युद्धाची भाषा केली आहे. करोना व्हायरच्या संकटामुळे चीन एकाकी पडल्याचे चित्र आहे. कारण करोना व्हायरसच्या साथीची सुरुवात वुहान शहरातून झाली आणि चीनने हे सत्य दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर होत आहे.