स्थैर्य, दि.१: रिलायंस समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान गमावला आहे. चीनमधील ‘लोन वुल्फ’ नावाने प्रसिद्ध असणारे आणि बाटली बंद पाण्याचा व्यवसाय करणारे झोंग शानशान यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. शानशान यांच्या कमाईत या वर्षी 70.9 बिलियन डॉलरची वाढ होऊन 77.8 बिलियन डॉलर झाली आहे.
शेअर्समध्ये झालेल्या 2000% च्या उसळीमुळे संपत्ती वाढली
बाटली बंद पाणी बनवणारी कंपनी नोंगफू स्प्रिंग आणि कोरोना व्हॅक्सीन बनवणारी कंपनी वेन्टाई बायोलॉजिकल एंटरप्राइज या शानशान यांच्या कंपन्या आहेत. कोरोना व्हॅक्सीन बनवत असल्यामुळे त्यांच्या कंपन्या चीन आणि हॉन्गकॉन्गमध्ये लोकप्रिय आहेत. या दरम्यान वेन्टाईच्या शेअर्समध्ये 2000% ची वाढ झाली आहे. तर, लॉकडाउनदरम्यान मागणी वाढल्यामुळे नोंगफूच्या शेअर्समध्ये 155% पेक्षा जास्तीची वाढ झाली आहे. शानशान यांनी मुकेश अंबानी यांच्यासह चीनमधील श्रीमंत व्यक्ती जॅक मा यांनाही मागे टाकले आहे.
चीनमध्ये Lone Wolf नावाने लोकप्रिय
66 वर्षीय झोंग शानशान चीनमध्ये ‘Lone Wolf’नावाने लोकप्रिय आहेत. आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी झोंग यांनी एक कंस्ट्रक्शन वर्कर, पत्रकार, हेल्थ सेक्टर आणि पाणी विकणारा एजेंट म्हणून काम केले आहे. त्यांचा जन्म चीनमधील हांग्जोमध्ये झाला. ग्रेट प्रोलेटेरियल कल्चरल क्रांतीच्या अनागोंदीदरम्यान ते प्राथमिक विद्यालयातून बाहेर झाले. झोंग यांनी आपली बेवरेज कंपनी Nongfu Spring ची स्थापना 1996 मध्ये केली होती. कंपनीने आपले पहिले पॅकेज्ड ड्रिंकिंग वाटर 1997 मध्ये लॉन्च केले होते. 2019 मध्ये Nongfu Spring ची कमाई 3.4 बिलियन डॉलर होती.
आशियातील टॉप-5 श्रीमंतांपैकी 4 चीनमधील
आशियातील टॉप-5 श्रीमंतांपैकी चारजण चीनमधील आहेत. यात पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर झांग शानशान आणि मुकेश अंबानी आहेत. तिसऱ्या नंबरवर कोलिन हुआंग आहेत. हुआंग ई-कॉमर्स कंपनी Pinduoduo चे फाउंडर आणि CEO आहेत. त्यांची एकूण संपत्ती 63.1 बिलियन डॉलर आहेत. यानंतर, 56 बिलियन डॉलरच्या संपत्तीसह टेंसेंटचे फाउंडर आणि चेअरमन पोनी मा चौथ्या नंबरवर आहेत. यानंतर पाचव्या नंबरवर अलीबाबाचे चेअरमन आणि फाउंडर जॅक मा आहेत. त्यांची एकूण संपत्ती 51.2 बिलियन डॉलर आहे.
श्रीमंतांच्या यादीत अंबानी 12 व्या स्थानी
मुकेश अंबानी यांनी यावर्षी रिलायंस जिओ आणि रिलायंस रिटेल वेंचर्सची भागीदारी विकून 1.9 लाख कोटी रुपये जमा केले. यामुळे अंबानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत चौथ्या नंबरवर आले होते. परंतू, मागील अनेक दिवसांपासून रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये होत असल्या कपातीमुळे सध्या 76.9 बिलियन डॉलरसह अंबानी 12व्या स्थानी आहेत.
जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती
रँक | नाव | नेटवर्थ(बिलियन डॉलर्समध्ये) |
1 | जेफ बेजोस | 192 |
2 | एलन मस्क | 167 |
3 | बिल गेट्स | 131 |
4 | बर्नार्ड अर्नॉल्ट | 115 |
5 | मार्क जकरबर्ग | 103 |
6 | वॉरेन बफे | 87.0 |
7 | लॅरी पेज | 81.9 |
8 | स्टीव बिल्मर | 80.2 |
9 | सर्जे ब्रिन | 79.3 |
10 | लॅरी एलिसन | 79.2 |