चायना मांजा लोकांच्या जीवाला फास बनू लागल्याने मांजावर बंदी आणावी; मानेला चायना मांजा कापून गेल्याने एक जण जखमी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : बंदी असतानाही फलटणमध्ये राजरोसपणे चायना मांजाची विक्री सर्रास होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर चायना मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच पालकवर्गानेही मुलांना त्याचे दुष्परिणाम समजावून सांगणे आवश्‍यक बनले आहे. फलटण तालुक्‍यात नागपंचमीस परंपरेनुसार मोठ्या उत्साहात व जल्लोषात पतंगबाजीला उधाण येते. त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक घटक सहभागी होत असतो. काटाकाटी, पेच, गोत खेळण्यासाठी मांजा महत्त्वपूर्ण असतो. सुरवातीस विविध प्रकारच्या धाग्यांपासून तयार करण्यात आलेला मांजा बाजारात उपलब्ध होता; परंतु काही वर्षांपूर्वी चायना मांजाने बाजारात शिरकाव केला आणि बाजारपेठही काबीज केली. रेडी फॉर यूज व मजबूत असणाऱ्या या मांजाकडे तरुणाईही आकर्षिली गेली; परंतु हा चायना मांजा लोकांच्या जीवाला फास बनू लागल्याने या मांजावर बंदी यावी म्हणून सर्वत्र रान उठू लागले व शासनास या मांजाच्या विक्रीवर बंदी आणावी लागली. काल (दिनांक २५ जुलै) रोजी फलटण येथे सुरेश काकडे यांच्या मानेला चायना मांजा कापून गेला सुदैवाने त्यांना काही झाले नाही. फक्त उपचारावर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे कळत आहे. 

फलटण शहरात मागील काळात चार वर्षाच्या बालकाचा, तर तालुक्‍यातील एका इसमाचा बारामती येथे चायना मांजाने गळा कापून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. अनेक दुचाकीस्वारही जखमी झाले आहेत. समस्त पालक वर्गासह दुचाकीवरून प्रवास करणारे, सायकलस्वार, पायी चालणाऱ्यांनाही चायना मांजाची आजही मोठी धास्ती आहे. चालताना अथवा दुचाकीवरून प्रवास करताना कुठूनही अचानकपणे मांजा समोर येऊन आपल्याला मोठी दुखापत होणार नाही ना? अशी धास्ती सर्वांनाच असते. आजवर अनेकांना गंभीरपणे मांजा कापल्याने धास्तीचे आता भीतीमध्ये रूपांतर झाले आहे.

पूर्वी मजबूत धाग्यापासून बनविण्यात येणाऱ्या मांजाच्या तुलनेत चायना मांजा अधिक स्वस्त व मजबूत असल्याने त्याला मागणीही मोठी आहे म्हणून सर्रासपणे या मांजाची जोरदारपणे चोरटी विक्री होत आहे. त्यामुळे बंदी असली तरी बाजारात त्याची चोरीछुपे मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यामुळे चायना मांजाच्या विक्रीपेक्षा उत्पादनावरच बंदी आणावी, अशीही मागणी व्यक्त होत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!