दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२१ । सातारा । ज्ञानदा सचिन कदम या सहा वर्षाच्या चिमुकलीने “संडे वन” हा २८० फुटी सुळका सर करून त्यावर तिरंगा फडकावला. या चिमुकलीचे साहस उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. भविष्यात हि चिमुकली गिर्यारोहणात वेगळा कीर्तिमान प्रस्थापित करेल, असे गौरवोद्गार आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी कठीण श्रेणीत गणला जाणारा आणि शिखर गाठण्यासाठी नेढ्यातून मार्ग काढावा लागणारा २८० फुटी “संडे वन” सुळका फलटण तालुक्यातील गिरवी गावच्या सहा वर्षीय ज्ञानदाने यशस्वीपणे सर केला. तिच्या या यशाबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तिचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी ज्ञानदाचे पालक सचिन कदम, सौ. मोक्षदा कदम यांच्यासह निरंजन कदम व इतर मान्यवर उपस्थित होते.
शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणारा ९० अंशातील सरळसोट चढाई, ओव्हरहँगचा खडतर मार्ग, निसरड्या पाऊलवाटेच्या शेजारी असणारी खोल दरी, पाण्याची कमतरता असलेला दुर्गम परिसर अशा सर्व आव्हानांना सक्षमपणे तोंड देत ज्ञानदा हिने अत्यंत चिकाटीने ही मोहीम फत्ते केली. यासारख्या अनेक मोहिमा फत्ते करण्याचे स्वप्न ती साकार करेल आणि जिल्ह्याचे नाव उंचावेल, अशा शुभेच्छा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी याप्रसंगी दिल्या.