
स्थैर्य, सातारा, दि. 17 नोव्हेंबर : गेल्याआठवड्याभरापासून जिल्ह्यात थंडीची चाहूल लागली होती. मात्र मागील दोन दिवसांत हवेतला गारठा अचानक वाढल्याने हिवाळ्याने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणार्या महाबळेश्वरासह सातारा शहराचा पारा तब्बत्न 12 अंशांपर्यंत घसरला, आणि जिल्ह्यात अक्षरशः हुडहुडी भरली.
थंडीचा हा कडाका वाढताच शहरासह ग्रामीण भागात शेकोट्या पेटू लागल्या आहेत. यावर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीचा मागमूसही नव्हता; मात्र अचानक बदललेल्या वातावरणामुळे थंडी लवकर उतरली. याचा परिणाम म्हणून सर्दी-खोकल्याचे आजार वाढू लागले असून सातार्यातील दवाखान्यांत संबंधित रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. दुसरीकडे, निरोगी आरोग्यासाठी मॉर्निंग वॉक करणार्यांची संख्या मात्र सकाळी रस्त्यांवर वाढलेली दिसते. कार्तिकी पौर्णिमेनंतर जिल्ह्यात गुलाबी थंडीचे आगमन झाले असून काहीच
दिवसांत थंडीत तीव्रता वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पहाटेच्या वेळी गारठा एवढा वाढला आहे की शाळेला जाणार्या चिमुकल्यांना आणि पालकांना कुडकुडत घराबाहेर पडावे लागत आहे.
अचानक वाढलेल्या थंडीने कष्टकरी वर्गाचे हाल सुरू झाले आहेत. रात्रपाळीत काम करणारे कर्मचारी, हमाल, पेपरविक्रेते यांना पहाटेपासूनच गारठ्यात काम करावे लागत आहे. पेपर विक्रेत्यांना हाडे गोठवणार्या थंडीत पार्सल उचलून वाटपासाठी घराघरांत फिरावे लागते. त्यामुळे हे कामगार शेकोटीची उब घेऊनच पुढे मार्गस्थ होत आहेत. बसस्थानक, मुख्य चौक, महामार्गालगतची थांबे अशी ठिकाणे शेकोट्या आणि गरम चहाच्या आस्वादाने गजबजलेली दिसत आहेत.

