दैनिक स्थैर्य | दि. २४ डिसेंबर २०२४ | फलटण |
महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या श्रीराम विद्याभवन, फलटण या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भरवलेल्या आठवडा बाजारात ‘भाजी घ्या भाजी… ताजी ताजी भाजी…, दहा रुपयांना मेथी, कोथिंबीर अन् गरमा गरम वडापाव, अशा आरोळ्यांनी हा बाजार चांगलाच गजबजला. यावेळी फळांचे गाव धुमाळवाडीचा फळ स्टॉल आणि विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या बाजारास ग्राहक आणि पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
प्रारंभी श्रीराम विद्याभवन, फलटण या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी भरवलेल्या कला, विज्ञान, फूड फेस्टिवल आणि आठवडा बाजारचा शुभारंभ श्रीराम बझारचे जनरल मॅनेजर अनंत पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ, कार्याध्यक्ष शांताराम आवटे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय शाळा समितीच्या अध्यक्षा अलका बेडकिहाळ, मसाप फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे, फलटण बीआरसी केंद्राच्या गट समन्वयक दमयंती कुंभार, प्रा. नंदाताई बोराटे, प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर, भिवा जगताप, सुरेखा सोनवले उपस्थित होते.
या बाजारात मुलांनी केलेली हजारो रुपयांची उलाढाल त्यांच्या व्यवहारज्ञानात निश्चित भर टाकेल, असा विश्वास व्यक्त करून टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या अप्रतिम अशा कलात्मक वस्तू आणि विविध छोटेमोठे विज्ञानाचे प्रयोग पाहून उपस्थित मान्यवरांनी मुलांच्या जिज्ञासेचे कौतुक केले. इ.सहावीतील साहिल सकट याने बनवलेल्या चांद्रयान प्रतिकृतीचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
सकाळपासून मुलांनी शेवगा, भोपळा, मेथी, वांगी, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, कोथिंबीर, आळू आदी पालेभाज्या आणि भाज्यांचे स्टॉल विक्रीसाठी विद्यार्थ्यांनी थाटले होते. भाज्यांच्या खरेदीसोबतच वडापाव, सामोसे, व्हेज मंच्युरियन, पास्ता, इडली, उडीदवडा सांबर, पाणीपुरी आणि ढोकळा या खाद्यपदार्थांच्या स्टॉलला खवय्यांनी अधिक पसंती देत चांगलाच ताव मारला.
यावेही फळांचे गाव धुमाळवाडी या फळ स्टॉलने सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. येथील सीताफळ, रामफळ, अंजीर, पेरु, बोरे, पपई, चिकू, लिंबू आदी फळांच्या खरेदीसाठी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. पालकांसोबतच मुलांनी खरेदीचा आनंद घेतला. तसेच विविध फनी गेम्सचाही आनंद घेतला.
प्रशालेचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी कला, विज्ञान, फूड फेस्टिवल आणि आठवडा बाजारासाठी विशेष परिश्रम घेतले. हेमलता गुंजवटे यांनी सूत्रसंचालन केले. मनीष निंबाळकर आणि भिवा जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.