कोविडमुळे दोन्ही पालक गमवलेल्या बालकांची माहिती 1098 या हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे जनतेला आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सांतारा, दि.२१: कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशा बालकांची माहिती नागरिकांनी 1098 या चाईल्ड हेल्पलाईन क्रमांकावर द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

कोव्हिड-19 मुळे दोन्ही पालक गमविलेल्या बालकांच्या संबंधी सुरक्षितेबाबत व दोन्ही पालक गमविलेल्या बालकांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन व उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृतीदल (Task Force) गठीत करण्यात आलेली आहे. या कृती दलाची बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आहे. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रभारी सचिव व्हि.जी. उपाध्य, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, जिल्हा संरक्षण अधिकारी चेतन भारती यांच्यासह स्वयंमसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोविड-19 या आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची तपशिलवार माहिती उपलब्ध करुन घ्यावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले, दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बाल कल्याण समिती यांच्यामार्फत त्यांचे आर्थिक व मालमत्ता विषयक तसेच कायदेविषयक हक्क मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी. या बालकांना आवश्यकतेनुसार बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात यावा. या बलाकांसाठी समुपदेशनाची व्यवस्था करावी व दत्तक प्रक्रियेची आवश्यकता असल्यास प्रचलित मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केल्या.


Back to top button
Don`t copy text!