हरिश्चंद्र गडावर पैलवान ग्रुपने मधमाशांच्या हल्ल्यापासून मुलांना वाचविले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ डिसेंबर २०२४ | बारामती |
बारामती येथील पैलवान ग्रुपने हरिश्चंद्र गडावर मधमाशांच्या झालेल्या हल्ल्यात पर्यटक असलेल्या लहान मुलांना वाचवून जीवदान दिले आहे.

रविवार, १५ डिसेंबर रोजी ट्रेकिंगसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘गोठाले गाव’ या ठिकाणी हा ग्रुप गेला होता. बारामतीमधील युवकाचा ग्रुपमध्ये सर्वाधिक पैलवान मंडळी आहेत, म्हणून त्यास ‘पैलवान ग्रुप’ असं म्हटलं जातं.

रविवार सुट्टीचा दिवस असल्याने हरिश्चंद्र गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती व काही शालेय मुलांच्या सहलीसुद्धा येथे आल्या होत्या. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आगी मोहोळाच्या मधमाशांनी तेथील पर्यटकांवर हल्ला सुरू केला व चावे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली व वाट मिळेल तिकडे पर्यटक पळू लागले. यामध्ये काही लहान मुलांना या मधमाशा चावू लागल्या व गर्दीमुळे लहान मुलेसुद्धा जोरजोरात रडू लागली. ज्यांना माशा चावल्या ती मुले काही ठिकाणी बेशुद्ध पडली. परिस्थितीचं गांभीर्य पाहून त्या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या पैलवान ग्रुपने लहान मुलांना उचलून खांद्यावर टाकून पुढील उपचारासाठी गडाच्या खाली त्वरित आणले आणि प्राथमिक उपचार देण्यासाठी स्थानिक डॉक्टरांकडे नेले. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित उपचार करून त्यांना बरे करण्यात यश आले. कदाचित उशीर झाला असता तर अनर्थ घडला असता.

लहान मुलांना उचलून आणण्यासाठी पैलवान ग्रुप बारामतीचे आकाश शेरेपाटील, शुभम पिसाळ, अभीजित आटोळे, ऋषिकेश माने, ईश्वर भोसले, सागर मुंडे, गौरव येवले, निनाद पाटील, निलेश मुळे, गणेश तावरे, विश्वजित भोसले, प्रशांत भरणे आदींनी जीवाची बाजी लावून मुलांना खांद्यावर घेऊन पळत पळत गडाच्या खाली आणले. त्यामुळे शिक्षक, पालक व इतर पर्यटक यांनी त्यांचे आभार मानले.

यावेळी अचानकपणे झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे सर्वच पर्यटक सैरभैर झाले होते; परंतु लहान मुलांकडे कोण लक्ष देत नव्हते. प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत होते, आसरा शोधत होते, पिसाळलेल्या माशांच्या चाव्यामुळे मुले बेशुद्ध झाली होती; परंतु वेळेत उपचार मिळाल्याने सर्वजण सुखरूप घरी पोहोचू शकली. ही परमेश्वराची कृपा आहे, पैलवान ग्रुप फक्त माध्यम असल्याची प्रतिक्रिया आकाश शेरे-पाटील यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!